नागपूर: उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्यास अटक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील त्रिकोणी पार्क, धरमपेठ येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याचा फोन मध्यरात्री २ च्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला आला. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. तातडीने श्वानपथकासह संपूर्ण परिसरात तपास केल्यानंतर हा फोनकॉल खोटा असल्याचे निष्पन्न झाले. खोटा फोन कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही व्यक्ती नागपूरच्या कन्हान भागात वास्तव्यास आहे. घरची वीज गेली म्हणून रागाच्या भरात आपण बॉम्ब ठेवल्याचा फोन केल्याची धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी माहिती त्याने दिली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांसोबत बोलताना या घटनेला दुजोरा दिला. दरम्यान, या परिसरात कोणतीही आक्षेपार्ह साहित्य किंवा घडामोड आढळून आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला मध्यरात्री दोन वाजता एका व्यक्तीने फोन केला. त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेब बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. तातडीने. बॉम्ब शोधक पथकाकरवी परिसर पिंजून काढण्यात आला. सोबतच परिसरात पोलिस सुरक्षा वाढविण्यात आली. थेट गृहमंत्र्यांशीच संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला. फोन कुठून आला याबाबत तांत्रिक तपास करण्यात आला. त्यात कन्हान येथून फोन करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर शोध घेऊन फोन करणाऱ्या आरोपीला शोधून काढत त्याला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा