नागपूर : एक कोटींची मागणी, '२५ लाख लाच' स्वीकारताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

नागपूर : एक कोटींची मागणी, '२५ लाख लाच' स्वीकारताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या दोन तक्रारीमधील चौकशी थांबवण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर २५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती एमआयडीसीचे टेक्नीशियन दिलीप वामनराव खोडे (वय.५०) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेखर भोयर ( जि. अमरावती )या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एका आमदाराच्या नावाचीही चर्चा होत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत नागपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरुद्ध विधान परिषदेचे काँग्रेस आमदार वजाहत मिर्झा यांच्याकडे त्यांच्या  विभागातील महिला अधिकारी यांनी तक्रार केली होती. मात्र या तक्रारीमध्ये विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित न करणे आणि तक्रारीवर कोणतीही कारवाई न होता परस्पर समेट घडविण्यासाठी आरोपी दिलीप वामनराव खोडे यांनी दोन केसेसचे प्रत्येकी ५० लाख अशी एकूण एक कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर २८ मार्च रोजी तक्रारदारास तडजोडीनुसार २५ लाख रुपये लाचेची मागणी केली. नागपुरातील रविभवन परिसरात एसीबीने दिलीप वामनराव खोडे यांना पंचासमक्ष ही रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. एका आमदाराचे नाव या प्रकरणाशी जुळल्याने एसीबी,पोलिस अधिक खबरदारी घेत असल्याचे चित्र आहे.  लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन मते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा 

Back to top button