Nitin Gadkari : नितिन गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारा नागपूर पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

Nitin Gadkari : नितिन गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारा नागपूर पोलिसांच्या ताब्यात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात खंडणीसाठी फोनवरून धमकी देणाऱ्या जयेश पुजारा ऊर्फ जयेश कांथाला याला पोलिसांनी बेळगाव कारागृहातून चौकशीसाठी नागपुरात आणले आहे. गुन्हेशाखेचे पथक त्याला घेऊन शहरात पोहोचताच प्रथम त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. गँगस्टर जयेशने बेळगावच्या कारागृहातूनच गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयातील लँडलाईनवर फोन करून खंडणीसाठी धमकावले होते. प्रथम दि. १४ जानेवारीला १०० कोटीची आणि  गेल्या आठवड्यात त्याने १० कोटीसाठी धमकीचे फोन केले होते. (Nitin Gadkari)

याप्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी स्थानिक पोलिस व कारागृह कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारागृहात सर्च ऑपरेशन राबविले. यात पुजाराकडून धमकीच्या फोनसाठी वापरलेले दोन सीमकार्ड आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले. यामुळे फोन पुजारानेच कारागृहातून केल्याचे स्पष्ट झाले आहे. खून प्रकरणात आरोपी असणाऱ्या पुजाराला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून त्याला बेळगाव कारागृहात ठेवण्यात आले आहे. जानेवारीमध्ये केलेल्या कॉल दरम्याने त्याने १०० कोटींच्या खंडणीची मागणी कली होती. दुसऱ्यांदा केलेल्या फोन दरम्यान १० कोटी गुगल पेवर पाठवायला सांगितले होते. (Nitin Gadkari)

नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून खंडणीची मागणी केल्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांच्या पथकातर्फे बेळगावमधील हिंडलगा कारागृहातील कैद्यांची चौकशी करण्यात आली. मोबाईलचा तपास घेत कैद्यांकडून नागपूर पोलिसांनी विविध स्वरूपाची माहिती घेतली आहे. आरोपी जयेशने जेलमधूनच अशा पद्धतीने मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे फोन केल्याचीही माहिती मिळाली आहे.

प्रारंभी धमकी प्रकरणात बंगळूरू येथील एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले होते. ही तरुणी बंगळुरू येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते. गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्याने एक नंबर देत या नंबरवर दहा कोटी रुपयांची खंडणी पाठवण्यास सांगितले होते. या नंबरचा तपास केला असता तरुणीचे नाव समोर आले. तिचा एक मित्र कारागृहात असल्याची माहिती तपासात समोर आले.

हेही वाचा;

Back to top button