कोल्हापूर: सैनिक टाकळी येथील गायरान जमिनीबाबत पुनर्विचार करावा : राजू शेट्टी | पुढारी

कोल्हापूर: सैनिक टाकळी येथील गायरान जमिनीबाबत पुनर्विचार करावा : राजू शेट्टी

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापुराचा धोका कायम आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील अकिवाट, सैनिक टाकळी, टाकळीवाडी, तेरवाड या गावातील गायरान जमिनी महापुरात तात्पुरता स्थलांतरासाठी एकमेव पर्याय आहे. परंतु, या जमिनींवर शासनाने औद्योगिक वसाहत उभी केल्यास पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्याचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीबाबत प्रशासनाने पुनर्विचार करावा, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

‘दैनिक पुढारी’ च्या प्रतिनिधीशी बोलताना शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसतो. पंचगंगा, कृष्णा नदी काठावरील शिरढोण, हिरवाड, तेरवाड, कुरुंदवाड, मजरेवाडी, अखीवाट, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, या गावांना व शेतीला महापुराचा पहिल्यांदा फटका बसतो. अशातच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापुराचा प्रश्न बिकट होणार आहे. या भागातील पूरग्रस्तांना स्थलांतर होण्यासाठी सैनिक टाकळी, अकिवाट, तेरवाड येथील गायरान हा एकमेव पर्याय आहे. या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभी झाल्यास पूरग्रस्तांचे स्थलांतर सरकार कुठे करणार आहे ? असा सवाल उपस्थित करत शेट्टी यांनी याबाबत पुनर्विचार करावा, असे म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button