भंडारा : रामपूर येथील तरुणाच्या खून प्रकरणी दोघांना अटक | पुढारी

भंडारा : रामपूर येथील तरुणाच्या खून प्रकरणी दोघांना अटक

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : शेतातून दूध घेऊन घराकडे येत असलेल्या तरुणाचा गावालगतच्या शेतात मृतदेह आढळून आल्याची घटना  २२ मार्च रोजी मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीतील रामपूर (मांडेसर) येथे उघडकीस आली होती. प्रदीप लक्ष्मण धांडे (वय ३५) रा.रामपूर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हिवराज बनकर (३६), अमोल निंबुळकर (२८) दोघेही रा. रामपूर अशी आरोपींची नावे असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.

मोहाडी तालुक्यातील रामपूर येथील प्रदीप धांडे हा शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करीत होता. बुधवार (दि.२२) रोजी सायंकाळी तो शेतात बांधलेल्या जनावरांचे दूध काढण्यासाठी गेला होता. दूध काढल्यानंतर दुधाची बादली घेऊन घराकडे निघाला. मात्र तो घरी आलाच नाही. त्यानंतर घरच्यांसह गावकऱ्यांनी शोधाशोध केली. तेव्हा गावालगतच्या एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला.  त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव केल्याच्या जखमा होत्या. यानंतर गावकऱ्यांनी याची माहिती मोहाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला होता. तपासाअंती याप्रकरणी आता दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. प्रदीप हा आई- वडिलांना एकुलता असून त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button