कामावर का जात नाही? जाब विचारल्याने मुलाने जन्मदात्या आईचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून केला खून | पुढारी

कामावर का जात नाही? जाब विचारल्याने मुलाने जन्मदात्या आईचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून केला खून

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: कामावर जात नसल्याचा जाब विचारल्याने मद्यपी मुलाने जन्मदात्या आईचा सिमेंटचा गट्टू मारून खून केला. हा प्रकार ९ मार्च रोजी निराधार नगर, पिंपरी येथे घडला. परेगाबाई अशोक शिंदे (वय ५८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. विश्वास अशोक शिंदे (३०, रा. निराधानगर, पिंपरी) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत परेगाबाई यांचा मुलगा विश्वास हा कचऱ्याच्या घंटागाडीवर मजूर म्हणून काम करीत होता. दरम्यान, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आरोपी सन २०१५ पासून चार वर्षे येरवडा जेलमध्ये होता. जेलमधून सुटल्यानंतर आरोपीला दारुचे व्यसन लागले. दारू पिऊन आल्यानंतर आरोपी विनाकारण त्याची आई परेगाबाई यांच्याशी भांडण करायचा. परेगाबाई या कचरा गोळा करण्याचे काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या.

दरम्यान, ९ मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास दारुच्या नशेत झोपलेला विश्वास याला उठवण्याचा परेगाबाई यांनी प्रयत्न केला. कामावर का जात नाही, याचा जाब परेगाबाई यांनी विचारला. याचा राग आल्याने आरोपीने परेगाबाई यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक (गट्टू) मारला. जीव वाचविण्यासाठी त्या पळत सुटल्या. विश्वास याने पाठलाग केला. त्यावेळी परेगाबाई पायात पाय अडकून पडल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. त्यावेळी विश्वास निघून गेला. परेगाबाई व विश्वास यांच्यातील भांडणाबाबत शेजारच्या लोकांना माहिती होते. परंतु, त्या पाय घसरून पडून गंभीर जखमी झाल्या असा समज होता. परेगाबाई यांना त्यांच्या मुलीने तळेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान परेगाबाईचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने तपास सुरू केला. आईचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर विश्वास शिंदे पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक गणेश माने, सहायक फौजदार शिवानंद स्वामी, पोलीस कर्मचारी दिलीप चौधरी, आतिश कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Back to top button