सिंधुदुर्ग : सख्ख्या भावाकडून भावाचा चाकूने भोसकून कुंभवडेत खून | पुढारी

सिंधुदुर्ग : सख्ख्या भावाकडून भावाचा चाकूने भोसकून कुंभवडेत खून

कणकवली; पुढारी वृत्तसेवा :  कुंभवडे-चिरेखणवाडी येथील स्टॅनी आंतोन डिसोजा (वय 35) या तरुणाचा त्याचा मोठा भाऊ आयसिन आंतोन डिसोजा (37) याने मद्यधुंद स्थितीत बुधवारी रात्री 10.45 वा.च्या सुमारास पोटात चाकू घुसवून खून केला. त्याची आई स्टॅनी याचे लाड पुरवते, असा समज करून पूर्वीपासूनच भावाचा राग करणार्‍या रागीट स्वभावाच्या आयसिनने हे कृत्य केले. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी तत्काळ कुंभवडेत जाऊन संशयित आरोपी आयसिन याला गजाआड केले. त्याने खुनाची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे या कृत्याचा त्याला अजिबात पश्चाताप झाला नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. गुरुवारी सायंकाळी आयसिन याला कणकवली न्यायालयात हजर केले. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

सिंधुदुर्गात कौटुंबिक कलहातून सख्ख्या भावाकडून भावाचाच खून होण्याची गेल्या पंधरा दिवसांतली ही तिसरी घटना आहे. कुंभवडे-चिरेखणवाडी येथे आंतोन झुजे डिसोजा, सौ. मार्टीना डिसोजा, मोठा मुलगा आयसिन, लहान मुलगा स्टॅनी असे एकत्र राहतात. संशयित आयसिन याचे लग्न झाले असून त्याची पत्नी व मुलगी मुंबई येथे शिक्षणासाठी राहतात. तर लहान मुलगा स्टॅनी हा मुंबई येथे वेल्डींगचे काम करायचा. मागील तीन महिन्यांपासून तो गावी कुंभवडे येथे रहाण्यास आला होता. तो अविवाहीत होता. तर आयसिन हा गोवा येथे हॉटेलमध्ये कामास होता. तो मागील पंधरा दिवसापासून गावी कुंभवडे येथे आला होता. रागीट स्वभावाचा असलेला आयसिन हा सातत्याने भाऊ स्टॅनी याचा राग करत असे. त्याला घरातील चाकू दाखवून मला कुणी अटॅक केला तर त्याला मारेन असे बोलत असे.
बुधवारी रात्री 10 वा.च्या सुमारास स्टॅनी याचे आई, वडील आणि आयसिन असे एकत्र जेवले. जेवण झाल्यानंतर आयसिन फोनवर बोलण्याकरीता घराच्या बाहेर गेला होता. त्यावेळी त्याचा भाऊ स्टॅनी रात्री 10.45 वा.च्या सुमारास घरी आला. त्याने आईला जेवण काय बनवले आहे?अशी विचारणा केली. त्यावेळी आईने आज मासे आहेत, जेवून घे, आयसिनच्या तोंडाला लागू नकोस असे सांगितले. तेव्हा स्टॅनी हा किचनमध्ये जेवण घेण्यासाठी गेला. त्यानंतर आई झोपण्यासाठी गेली. काही वेळाने किचनमधून स्टॅनी आणि आयसिन या दोघांचा भांडणाचा आवाज ऐकू आला. म्हणून आई मार्टीना ही किचनकडे धावत आली असता आयसिन याने त्याचा लहान भाऊ स्टॅनी याच्या पोटात चाकू घुसवून तो बाहेर काढल्याचे पाहिले. त्यानंतर स्टॅनीच्या पोटातून रक्त बाहेर आले. दोघांची झटापट सुरूच होती. आई मार्टीना ही त्यांना सोडविण्यासाठी गेली असता स्टॅनी हा जमिनीवर पडला आणि आयसिन हा घराच्या बाहेर निघून गेला. मार्टीना हिने मोठमोठ्याने ओरडाओरड केली असता शेजारील हेलन डिसोजा, जोसेफ डिसोजा, लुसी डिसोजा, रॉबर्ट डिसोजा, फॅलेक्स डिसोजा हे त्या ठिकाणी धावत आले. झाला प्रकार पाहून कुणीतरी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली. काही वेळात अ‍ॅम्ब्युलन्स घराकडे आली. अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉक्टरांनी स्टॅनी याला तपासून पाहिल्यानंतर तो मयत झाल्याचे सांगितले. सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याने कुंभवडेत एकच खळबळ उडाली.

कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल

कुंभवडेतील खुनाची घटना समजताच कणकवलीचे पोलिस निरीक्षक अनिल जाधव, हवालदार चंद्रकांत झोरे, सचिन माने आदी रात्रीच कुंभवडेत घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवून संशयित आयसिन याला ताब्यात घेतले. याप्रकरणी मयत स्टॅनी याची सौ. मार्टीना डिसोजा यांनी मुलगा आयसिन याच्याविरूध्द स्टॅनीचा पोटात चाकू घुसवून खून केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. याप्रकरणी आयसिन डिसोजा याच्याविरूध्द पोलिसांनी भादवि 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विचारणा केल्यानंतर संशयित आयसिन याने खुनाची कबुली देत भाऊ स्टॅनी हा स्वत:ला मोठा स्ट्राँग समजत होता, म्हणून त्याला मारल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी तपास पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिस करत आहेत.

आयसिन आला होता भावाची तक्रार घेवून

संशयित आरोपी आयसिन हा चार दिवसापूर्वी त्याचा आता मयत झालेला भाऊ स्टॅनी याच्याविरूध्द कणकवली पोलिस स्थानकात तक्रार देण्यासाठी आला होता. मात्र त्याने काही तक्रार दिली नव्हती. आता पोलिसांशी बोलताना जर मी तक्रार दिली असती तर हा प्रकार घडला नसता असे त्याने सांगितले. दुपार नंतर आयसिन आणि स्टॅनी यांनी शेजारी एकत्र टीव्हीवर मॅच बघितली होती. मात्र रात्री अचानक आयसिनच्या डोक्यात राग शिरला आणि त्याने भावाचा जीव घेतला. चार दिवसापूर्वी त्याने भावाला तर सहा महिन्यापूर्वी आईला धमकी दिल्याचेही पोलिस तपासात पुढे येत आहे.

Back to top button