नागपूर: विद्यापीठ सिनेटसाठी १०२ मतदान केंद्रावर मतदान; मंगळवारी मतमोजणी | पुढारी

नागपूर: विद्यापीठ सिनेटसाठी १०२ मतदान केंद्रावर मतदान; मंगळवारी मतमोजणी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सिनेटच्या पदवीधर प्रवर्गातील १० जागांसाठी आज (दि.१९)  सकाळी ८  वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. नागपूरसह वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत एकूण १०२ मतदान केंद्रांवर मतदान सुरू असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. दुपारनंतर पावसाळी वातावरणाचा काहीसा प्रभाव मतदानावर जाणवला. १० जागांसाठी एकूण ५१ उमेदवार रिंगणात असून ६०,३७६ मतदार मतदान करणार आहेत. यंदा नवमतदारांची संख्या वाढल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. नवमतदार या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार असून मंगळवारी मतमोजणी होणार आहे. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सर्वाधिक ३५ मतदान केंद्र नागपूर शहरात आहेत. ग्रामीणमध्ये २२, भंडारा जिल्ह्यात २१, गोंदियात ११ आणि वर्धा जिल्ह्यात १३ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. सर्वच केंद्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये आहेत. संपूर्ण प्रक्रियेसाठी ४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुलसचिव राजू हिवसे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले, विशेष कार्य अधिकारी वसीम अहमद, राजेंद्र उतखेडे, मेहताब खान, गणेश कुमकुमवार, शैलेश राठोड, स्वप्निल मोडक, नितिन खरबडे हे जबाबदारी सांभाळत आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत पदवीधर, शिक्षक मतदारसंघात विजय मिळाल्यानंतर उत्साह वाढलेली महाविकास आघाडी, शिक्षण मंच, परिवर्तन पॅनल, शिक्षक भारती, युवा ग्रेज्युएट फोरम आदी संघटनांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

विद्यापीठाचे कार्यक्षेत्र विस्तारले असल्याने या जिल्ह्यांमधील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांपुढे होते.अन्य प्रवर्गातील निवडणुका व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवेळी उमेदवारांनी आपलाही प्रचार केला. एकंदरीत सुमारे महिनाभरापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. यावेळी प्रामुख्याने सोशल मीडियाचे माध्यम प्रभावी ठरले. मंगळवारी २१ मार्चला मतमोजणीनंतर मतदारांचा कौल कुणाला ते स्पष्ट होणार आहे.

           हेही वाचलंत का ?

Back to top button