कोल्हापूर : बाळूमामाच्या महाप्रसादासाठी १८ टन धान्य; दोन लाख भाविकांनी घेतला लाभ

कोल्हापूर : बाळूमामाच्या महाप्रसादासाठी १८ टन धान्य; दोन लाख भाविकांनी घेतला लाभ

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गरू बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत आज (दि.१९) दोन लाखावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी दहा टन तांदूळ, चार टन गहू आणि चार टन गुळ याच्यासह एकूण १८ टन धान्यांचा वापर करण्यात आला होता.

या वर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात होणार हे ओळखून देवालय समितीने एकूण बारा काहिलीचा प्रसाद तयार केला होता. महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रसाद वाटपाचे नियोजन उत्तम रीतीने केल्यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने प्रसादाचा लाभ घेता आला. उन्हाचा भक्तांना त्रास होऊ नये यासाठी भव्य मंडप घालण्यात आले होते. मंडपामध्ये प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवस्थान समिती, ग्रामपंचायत, प्रशासन, उत्सव समिती आणि ग्रामस्थ यांच्या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.

भक्तांना प्रसाद घरी देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती. संध्याकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद चालू होता. बिद्री साखर कारखाना, गोकुळ दुध संघ, स्वयंसेवी संस्था व भागातील ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. अध्यक्ष धैर्यशील भोसले, संदीप मगदूम, रावसाहेब कोणकेरी, शामराव होडगे, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, विजय गुरव, यशवंत पाटील, एस.पी.पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, संताजी भोसले, मारुती पाटील यांनी भेटी देऊन पाहणी केली.

चारशे स्वयंसेवकांनी बजावली सेवा

बाळूमामा देवालय समिती व ग्रामस्थ यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती, बेळगाव आदी जिल्ह्यातील सुमारे ४०० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सेवा बजावली. त्यामुळे यात्रेमध्ये शिस्तबद्ध नियोजन दिसून आले.

मोफत टू व्हीलर दुरुस्ती सेवा

यात्रा उत्सव काळात भाविकांच्या सेवेसाठी मोफत टू व्हिलर दुरुस्ती व पंक्चर मोफत काढून देण्याची सेवा करण्यात आली. मिनल ऑटोमोबईल व मुरगूड मेकॅनिकल टू व्हिलर असोसिएशन मुरगूड यांच्यातर्फे ही सेवा देण्यात आली. यासाठी दिपक माने, यशवंत भाट, अमोल पाटील, गोविंद मोरबाळे, संग्राम ढेरे, विनायक भोसले, अशोक मांगले, शरद पाटील, अमोल मांगले यांच्यासह अनेक दुरुस्त्या करणारे मेकॅनिक उपस्थित होते. ही सुविधा आदमापुरातील भक्तनिवास शेजारी करण्यात आली होती. नादुरूस्त दुचाकीस्वाराने संपर्क केल्यास आवश्यकतेनुसार जागेवर जाऊन गाडीची दुरुस्ती करून दिली जात होती.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news