वर्धा तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी | पुढारी

वर्धा तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा शहरालगतच्या गावांमध्ये आरोग्य सेवा तुटपूंजी असल्याने नागरिकांना उपचाराकरिता शहरात धाव घ्यावी लागते. त्यामुळे या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांना मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केली होती.  याची दखल घेत शासनाने वर्धा तालुक्यात सालोड, पिपरी (मेघे), बोरगाव (मेघे), साटोडा, सिंदी (मेघे) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजूरी दिली आहे.

शहरालगतच्या पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), सालोड (हि.), बोरगाव (मेघे), मसाळा, नालवाडी, आलोडी (साटोडा), वरुड, पवनार या ग्रामपंचायतींची लोकसंख्या सुमारे १५ हजार पेक्षा अधिक आहे. लोकसंख्येचा विचार करता पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने शहरात धाव घ्यावी लागते. अनेकवेळा आरोग्य सुविधा वेळेवर उपलब्ध न झाल्यास जीवघेण्या प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. या भागात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी आमदार भोयर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. शासनाने याची दखल घेत वर्धा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली आहे. सालोड, पिपरी (मेघे), बोरगाव (मेघे), साटोडा, सिंदी (मेघे) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणार असल्याने परिसरातील नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button