प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा तरुण नेत्यांना त्रास : आशिष देशमुखांचा आरोप | पुढारी

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा तरुण नेत्यांना त्रास : आशिष देशमुखांचा आरोप

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसमध्ये तरुण, तडफदार आणि ऐन उमेदीत असलेले जे नेते आहेत, त्यांना त्रास द्यायचा, शेवटी काँग्रेसमधून बाहेर जाण्यास त्यांना बाध्य करायचे, हेच काम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करत नाही ना ? हा माझ्यासकट पक्षातील तरुण कार्यकर्त्यांसमोरचा प्रश्‍न आहे, असे माजी आमदार आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि निष्ठावान नेत्यांनाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केवळ त्रास देण्याचेच काम केलेले आहे. नाईलाजापोटी त्यांनाही अखेरीस टोकाची भूमिका घ्यावी लागली आहे. पंजाबमध्ये याच प्रकारे सत्ता गेली. नवज्योतसिंह सिद्धु, कॅप्टन अमरिंदर सिंह आणि चन्नी यांच्यामध्ये असाच घोळ निर्माण झाला. वेळीच लक्ष घालण्यात आले नाही. तीच स्थिती आता महाराष्ट्रात निर्माण होऊ पाहत असल्याची भीती देशमुख यांनी व्यक्त केली.

एकंदरीत नाशिकमध्ये सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतरच्या घडामोडीत थोरात यांची आक्रमक भूमिका लक्षात घेता पटोले विरोधक सक्रीय झाले आहेत. विधान परिषद निवडणूक विजयाचे क्रेडिट घेणाऱ्या पटोले यांनी उमेदवारी, समर्थन देण्यावरून घातलेला घोळ पुन्हा एकदा विरोधकांनी दिल्ली दरबारी पोहोचविला आहे. तातडीने राज्य प्रभारी पाटील मुंबईत आले. आता पक्षश्रेष्ठी पटोले की थोरात यांना अभय देतात. यावर काँग्रेसमधील डॅमेज कंट्रोल अवलंबून आहे.

हेही वाचा 

Back to top button