

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या वित्तीय संस्थांमध्ये देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. परंतु, केंद्रातील मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला आहे. अदानी समूहातील गैरकारभारामुळे गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये परत मिळतील का? अशी भीती निर्माण झाली आहे. मोदी सरकारमुळेच सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात आला असल्याचा आरोप चंद्रपूर (Chandrapur ) शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आज सोमवारी (६ फेब्रूवारी) चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आंदोलनात बोलत होते.
अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दापाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थांमधील अदानी समूहात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीसंदर्भात संसदेत चर्चा व्हावी, गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवा राव, माजी महापौर संगीता अमृतकर, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, कृउबासचे माजी सभापती दिनेश चोखारे, प्रकाश पाटील, मारकवार ओबीसी आघाडीचे उमाकांत धांडे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा