Balasaheb Thorat : विधान परिषद निवडणुकीतील राजकारण व्यथित करणारे, पक्षश्रेष्ठींना कळवणार : बाळासाहेब थोरात

पुढारी ऑनलाईन डेस्क : अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत झालेले राजकारण व्यथित करणारे आहे. याबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवणार आहे. याचा राज्य पातळीवर आणि पक्ष पातळीवर योग्य तो निर्णय करू, असा इशारा थोरात (Balasaheb Thorat) यांनी पटोले यांचे नाव न घेता दिला. यावेळी त्यांनी निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल तांबे यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक काळात दिल्लीतील नेतृत्त्व आमच्याशी चर्चा करत होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमच्या विरोधात बोलत होते. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचे षड्यंत्र रचण्यात आले; परंतु मी भविष्यात अपक्ष राहणार असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचेही मार्गदर्शन घेऊन काम करत राहणार आहे, मी काँग्रेस सोडलेली नाही, असे आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी (दि. ४) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. तांबे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी, कटकारस्थान रचण्यात आले. माझा कुटुंबावर आरोप करणे, हे स्क्रिप्टेड षड्यंत्र होते. ही स्क्रिप्टेड स्टोरी माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना अडचणीत आणण्यासाठी रचण्यात आली, असा आरोपही तांबे यांनी केला होता.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे एबी फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्ष व एबी फॉर्म संदर्भात जे आरोप केले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. तांबे यांच्या आरोपांना पक्षाचे प्रवक्ते उत्तर देतील. माझ्याकडेही भरपूर मसाला आहे, योग्य वेळ आल्यास तो बाहेर काढू, असा इशारा पटोले यांनी दिला होता.
हेही वाचा
- सत्यजित तांबेंना योग्य असाच एबी फॉर्म पाठवला : नाना पटोले
- आमदार सत्यजित तांबे : निवडणुकीत प्रदेश स्तरावरून दिले चुकीचे एबी फॉर्म
- Satyajit Tambe : मी अपक्षच, काँग्रेस सोडलेली नाही : सत्यजित तांबे यांची स्पष्टोक्ती