पुणे : बारामती मतदारसंघाऐवजी पुणे दक्षिण मतदार संघ नामकरण करा ; विजय शिवतारे यांची मागणी | पुढारी

पुणे : बारामती मतदारसंघाऐवजी पुणे दक्षिण मतदार संघ नामकरण करा ; विजय शिवतारे यांची मागणी

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघात यापूर्वी नेहमीच नुरा कुस्त्या होत आल्या आहेत. मी या मतदारसंघातून इच्छुक असून तशी इच्छा मी यापूर्वीच प्रकट केली आहे. परंतु यासंबंधीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे घेतील अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. बारामती हे मतदारसंघाचे नाव बदलून ते पुणे दक्षिण असे करावे, अशी आग्रही मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यावेळी सोबत होते. शिवतारे म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघात विकासकामांचा असमतोल दिसून येतो. खासदारांनी केंद्राकडून एएसआयसी हाॅस्पिटल बारामतीसाठी मंजूर करून आणले. वास्तविक त्यासाठी पुरंदर अथवा खेड शिवापूर हे मध्यवर्ती ठिकाण ठरले असते. प्रत्येक विकासाची बाब बारामतीला आणली जात आहे. दौंड, इंदापूर, भोर, पुरंदरवर त्यातून अन्याय होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रेल्वेची कनेक्टीव्हीटी असलेल्या दौंडमध्ये झाले असते तर मोठ्या प्रमाणावर तेथील विकास झाला असता. परंतु ते होवू दिले गेले नाही. बारामतीला बसस्थानकासाठी २२० कोटी मिळतात. पंरतु फुरसुंगी, उरुळी देवाची पाणी योजनेसाठी येथील नेतृत्वाने २५ कोटी मिळू दिले नाहीत. आता सत्तांतरानंतर तो निधी आम्हाला मिळाला.

बारामतीचा विकास म्हणजे शहराचा विकास आहे का, तालुक्यातील ३९ गावे अद्याप पाण्याविना आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या वाढदिवसी त्यांनी घरावर काळे झेंडे फडकावले होते. पंतप्रधानांसह मोठे नेते आणत शहर व परिसराचा विकास दाखवला जातो. प्रत्यक्षात तालुक्याचा विकास झाला आहे का, असा सवाल शिवतारे यांनी केला.

शरद पवार यांच्याकडे १८ तास काम करण्याची दूरदृष्टी आहे. पण आत्मकेंद्री राजकारणामुळे ते मागे पडल्याची टीका शिवतारे यांनी केली. आमच्या पक्षावर सातत्याने गद्दारीचा आरोप केला जात आहे. खोके सरकार म्हणून संभावना केली जात आहे. अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडल्यानंतर सध्याच्या सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही आता गावोगावी जात आहोत. मागील निवडणूक भाजप-सेनेला स्पष्ट कौल दिला असताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय स्वार्थापोटी काॅंग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे खरे गद्दार कोण हे जनतेला कळाले असल्याचे ते म्हणाले.

नुकत्याच प्रसिद्ध एका सर्व्हेवर त्यांनी टीका केली. गुजरात निवडणूकीपूर्वी असे सर्व्हे जाहीर झाले होते. प्रत्यक्षात तेथे भाजपला आजवरचा सर्वाधिक मोठा विजय मिळाल्याचे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रखडल्या असून सरकार निवडणूकांना भित असल्याच्या टीकेवर ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रवर्गाला आपला अधिकार मिळाला पाहिजे. तो मिळाला की लागलीच निवडणूका होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय विमानतळ होणारच

पुरंदरच्या पारगावला आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याची प्रक्रिया आता वेग घेईल. विमानतळासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मध्यंतरी मविआ सरकारच्या काळात पुरंदर, बारामतीच्या सिमेवरील जागा निश्चित करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु विमानतळ हे पारगाव परिसरातच होईल. तेथील शेतकऱयांकडून स्वेच्छा खऱेदी केली जाईल.l अथवा भूसंपादन करून जागा घेतली जाईल. यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून लवकरच ही प्रक्रिया सुरु होणार असल्याचे शिवतारे म्हणाले.

Back to top button