नागपूर : शिक्षक मतदारांचा उत्साह अन मतदानासाठी रांगा! | पुढारी

नागपूर : शिक्षक मतदारांचा उत्साह अन मतदानासाठी रांगा!

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी सोमवारी (दि.३०) २२ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. मुख्यत्वे तिहेरी लढतीत विद्यमान आमदार नागो गाणार यांची तिसऱ्यांदा विधानपरिषदेत जाण्यासाठी कसोटी लागणार आहे. मविआचे सुधाकर आडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्याशी त्यांची लढत आहे. विभागात काही ठिकाणी घेण्यात आलेल्या आक्षेपांचा अपवाद वगळता विभागात शांततेत मतदान झाले. दुपारी ३ पर्यंत या चुरशीच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढून ६१ टक्क्यांपर्यंत पोहचला.

शेवटच्या तासात अनेक केंद्रांवर रांगा होत्या. अनेकजण मतदानाला मुकल्याच्याही तक्रारी ऐकायला मिळाल्या. एकंदरीत मतदानासाठी शिक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पहायला मिळाले. आज सकाळपासूनच नागपूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा पहायला मिळाल्या. विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये १२४ मतदान केंद्रांवर मतदान झाले. यात नागपूर जिल्ह्यातील ४३ मतदान केंद्रांवर १६ हजार ४८० शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सिव्हिल लाईन्स येथील तहसील कार्यालय (ग्रामीण), म. न. पा. हिंदी प्राथमिक शाळा गांधीनगर आणि हिंगणा येथील पंचायत समिती कार्यालयातील मतदान केंद्रांवर मतदारांची सकाळी गर्दी झालेली पहायला मिळाली. मतदान कसे करावे, उमदेवारांची माहिती मतदान केंद्रांबाहेर भागात लावण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त पहायला मिळाला.

विभागीय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज अजनी चौकातील माउंट कार्मेल गर्ल्स हायस्कूलला आणि खामला चौकातील जुपिटर उच्च प्राथमिक शाळा (ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळ) या मतदान केंद्रांना भेटी दिल्या. निवडणुकीत खरी लढत रालोआ समर्थित नागो गाणार, महाविकास आघाडी समर्थित सुधाकर अडबाले व शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात आहे. यंदा जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा प्रचारात महत्वाचा ठरला, इतर मुद्दे त्यामुळे मागे पडले.

नागपुरातील मोहता विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर पक्षाचे चिन्ह असलेला स्कार्फ घालून प्रवेश केल्याबद्दल मविआचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी नागो गाणार आणि सुधाकर अडबाले या दोघांनीही आपल्या विजयाचे दावे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. या दोघांच्या मतविभाजनात आपण यावेळी बाजी मारणार असल्याचे राजेंद्र झाडे म्हणाले.

हेही वाचंलत का?

Back to top button