Graham Reid Resigns : टीम इंडियाच्या प्रशिक्षकांचा राजीनामा, हॉकी वर्ल्डकपमधील पराभवामुळे घेतला निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड (Graham Reid Resigns) यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हॉकी विश्वचषक 2023 मध्ये यजमान भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या स्पर्धेत भारतीय संघ नवव्या स्थानावर राहिला. स्पर्धेत विजयी सुरुवात करणा-या भारतीय संघाला क्रॉस ओव्हरच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली.
हॉकी इंडियाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, रीड यांनी विश्वचषक स्पर्धा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. टिर्की आणि हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी रीड आणि इतर सपोर्ट स्टाफची भेट घेऊन संघाच्या कामगिरीवर चर्चा केली. त्यांच्याशिवाय विश्लेषणात्मक प्रशिक्षक ग्रेग क्लार्क आणि वैज्ञानिक सल्लागार मिचेल डेव्हिड पेम्बर्टन यांनीही आपली पदे सोडली आहेत.’
रीड यांनी 2019 मध्ये भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
पद सोडल्यानंतर रीड म्हणाले, ‘मी बाजूला होण्याची वेळ आली आहे. संघ आणि हॉकी इंडियासोबत काम करणे हा एक सन्मान असून मी त्याचा खूप आनंद घेतला आहे. या अद्भुत प्रवासातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद लुटला आहे. संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.’
मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक नसल्यामुळे भारताच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे मानले जात आहे. रीड यांनी यासाठी स्वतःला दोष दिला. ते म्हणाले की, ‘हॉकी विश्वचषकाचे यजमानपद असल्याने संघावर अतिरिक्त दबाव होता. अशा परिस्थितीत संघासाठे मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक नियुक्त करण्याबाबत चर्चा झाली होती, पण त्यावेळी मला त्याची गरज वाटली नाही. मला वाटले की खेळाडूंच्या अशा गरजा पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा अनुभव आहे. पण मी त्यात अयशस्वी ठरलो, अशी भावना रीड यांनी व्यक्त केली.
रीड यांच्यासह तिघांचेही राजीनामे स्वीकारल्यानंतर अध्यक्ष टिर्की म्हणाले, “देशासाठी विशेषत: ऑलिम्पिकमध्ये चांगले परिणाम घडवून आणणाऱ्या रीड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफचा भारत नेहमीच ऋणी राहील. भारतीय हॉकीचा प्रवास सुरूच राहिल. आता नवीन दृष्टी घेऊन पुढे जाण्याची वेळ आली आहे.’