लोकसभा निवडणुकीत आम्ही ४५ हून अधिक जागा जिंकू : बावनकुळे

नागपूर; पुढारी ऑनलाईन : लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकाबाबत सी व्होटरच्या सर्वेक्षणावर महाराष्ट्रातील जनमत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दिसत असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात रालोआ ४५ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला आहे.
बावनकुळे म्हणाले की, “सी व्होटरच्या सर्वेक्षण म्हणजे राज्यातील १३ कोटी जनतेचा सर्व्हे नाही तर सँपल सर्व्हे आहे. त्यामुळे त्या आधारे लोकसभा निवडणुकीचे भवितव्य सांगणे कठीण आहे. या सर्व्हेवर कोणी आनंद किंवा दिवाळी साजरी करीत असेल तर त्यांनी करावी. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात पक्षसंघटना आणखी मजबूत करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. सर्वांना सोबत घेऊन आम्ही ५१ टक्के मतांची आकडेवारी निश्चितपणे गाठणार आहोत.”
सी व्होटरच्या सर्व्हेवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आकडेवारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. सर्व्हे करणाऱ्या संस्थेची सत्यता यापूर्वीही स्पष्ट झालेली आहे. पण, मी त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणार नसून या सर्व्हेने दिशा मात्र दाखविली आहे. ती दिशा सत्ताधाऱ्यांसाठी सोयीची नाही. कर्नाटकचा सर्व्हे वेगळा आहे. तेथे भाजपचे सरकार राहणार नाही; पण उत्तर प्रदेश सर्वात मोठा भाग आहे. तेथील ठराविक माहिती आमच्याकडे नाही, असे पवार म्हणाले होते. यावर बावनकुळे म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे नेहमीच सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब सांगत असतात. ग्राम पंचायत निवडणुकीच्या वेळीही त्यांनी असे सांगितले होते. मात्र, पंतप्रधान मोदींवर लोकांचा विश्वास आहे.’
हेही वाचा :
- शरद पवार आजही भाजपसोबतच; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट
- अब्दुल सत्तार यांनी उधळलेल्या स्तुतिसुमनांना महत्त्व देत नाही : खा. शरद पवार यांचे विधान
- Chandrashekhar Bawankule | …त्यावेळी शरद पवारांनी शकुनीमामाचे काम केले का ? : चंद्रशेखर बावनकुळे