ठाणे; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत. लवकरच सर्वांना हे समजेल, असा धक्कादायक दावा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एका जुन्या वृत्ताचा दाखला दिला.
ते म्हणाले की, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी मला लोक दोष का देतात? हे तर आमच्या पक्षाचे आधीपासून ठरले होते. मी फक्त सर्वात प्रथम गेलो. आमचा हा निर्णय २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वीच झाला होता. हा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील छुपे प्रेम लवकरच सर्वांसमोर येईल. शरद पवार यांचे राजकारणही सर्वांना समजेल, असे आंबेडकर म्हणाले. शिवसेनेला सत्तेची गरज नव्हती, त्यांना फक्त भाजपचा हात सोडायचा होता. त्यासाठीच राज्यात नवे राजकीय समीकरण पुढे आले. शिवसेनेने थोडा फार प्रयत्न करून सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा होता; पण तसे काही घडले नाही. आंबेडकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे बदलले हे मी म्हणणार नाही. दोघांत भांडण आहे. दोघेही हिंदुत्ववादी आहेत. मी जे भांडण म्हणतोय त्यात वैदिक हिंदू आणि संत हिंदू परंपरा हा संबंध आहे.
पवारांवरील वक्तव्याने आक्रमक झाली असून शरद पवारांना ॲड. आंबेडकर यांचा विरोध आजचा नाही. त्यांच्या भूमिका भाजपला फायदा होईल अशाच असतात, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.