Chandrashekhar Bawankule | ...त्यावेळी शरद पवारांनी शकुनीमामाचे काम केले का ? : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

Chandrashekhar Bawankule | ...त्यावेळी शरद पवारांनी शकुनीमामाचे काम केले का ? : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होऊच नयेत, यासाठी शरद पवारांनी राज्यात महाभारत घडवून आणले, शकुनीमामाचे काम केले की काय? असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. यामुळे आता केवळ उद्धव ठाकरेच नव्हे तर शरद पवार यांच्याविषयी देखील जनतेत संभ्रम निर्माण झाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज (दि.२७) नागपुरात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

जनतेच्या मनातील सरकार येऊ नये, म्हणून कपट कारस्थान करण्यात आले. पवारांनी जर हे कारस्थान केले नसेल, तर जयंत पाटील शरद पवार यांना बदनाम का करत आहेत, असा मुद्दा बावनकुळे यांनी उपस्थित केला. जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नसल्याने किंवा काही अन्याय झाल्याने ते असे बोलत आहेत की काय, असा सवालही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उपस्थित केला.

जयंत पाटील यांच्या विधानामुळे दोन शक्यता निर्माण होतात. एक तर शरद पवार हे या कटात सामील असतील व त्यांनी शकुनीमामाची भूमिका बजावली असेल. दुसरी शक्यता अशी आहे की जयंत पाटील खोटे बोलत असतील. त्यांच्या मनात राग असू शकतो. पण, जर ते खरे बोलले असतील तर शरद पवारांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. सत्तेच्या लालसेपोटी तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊच द्यायचे नाही, या भावनेतून त्यांनी हे कारस्थान केले असेल, असे ते म्हणाले.

फडणवीस यांच्यातील अशा कुठल्या गोष्टीमुळे पवारांना त्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते, त्यांची कुठली गोष्ट आडवी आली? कोणत्या भावनेने त्यांना फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं? फडणवीस मुख्यमंत्री होऊच नयेत, यासाठी त्यांना शकुनीमामा सारखा खेळ करावा लागला? याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे, असे बावनकुळे म्हणाले. जनतेच्या मताचा अनादर करून पवारांनी ही खेळी केली असेल, तर हे वाईट असून त्यांनी पुन्हा असे करु नये, त्यांच्याविषयी सर्वांनाच आदर आहे, अशी माझी त्यांना विनंती आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button