चंद्रपूर : ‘ताडोबा’त गाणी वाजवणं पडलं महागात!; वनखात्याचा पर्यटकांना दणका | पुढारी

चंद्रपूर : 'ताडोबा'त गाणी वाजवणं पडलं महागात!; वनखात्याचा पर्यटकांना दणका

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाकरीता येऊन वाहनांमध्ये गाणी वाजविणाऱ्या परराज्यातील पर्यटकांना ताडोबा व्‍याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने दणका दिला आहे. ताडोबात गाणी वाजविणे व पार्टी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकांना ५ हजारांचा दंड करण्यात आला. तसेच त्यांना ताडोबातून हुसकावून लावण्‍यात आले. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी संतोष थिपे यांनी केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात गाणे वाजविणे व पार्टी करण्यावर निर्बंध आहे. नुकताचा या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. परराज्यातील काही पर्यटक आपल्या खासगी वाहनांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनांकरीता आले होते. प्रकल्पातील मोहर्ली पद्मापूर मार्गाने जाऊन पर्यटकांनी आपल्या दोन चारचाकी गाड्या ताडोबा बफर सफारीच्या रस्त्याखाली उतरवले. येथे मोठ्याने गाणे लावून पार्टी करण्याचा  बेत त्यांनी आखला होता.

पर्यटकांचा धिंगाणा सुरू असल्‍याचा प्रकार स्थानिक गाईड व वाहन चालकांच्या निदर्शनास आला.  त्यांनी या प्रकाराची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर झोन) संतोष थिपे यांना देली. त्यांनी तत्‍काळ ताडोबा बफरक्षेत्रातील घटनास्थळ गाठले. येथे मोठ्याने गाणे लावून पार्टी करत असल्याचे पर्यटक आढळून आले. त्यांच्याकडून ५ हजारांचा दंड वसूल करून त्यांना ताडोबातून हुसकावून लावले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button