चंद्रपूर : खोल खड्ड्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : खोल खड्ड्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपून सायंकाळच्या सुमारास पोहण्याकरीता गेलेल्‍या तीन मुलांचा गडचांदूर शहरालगतच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने खोदलेल्या एका खोल खड्ड्यात बुडून दुर्देवी मृत्‍यू झाला. ही घटना काल (गुरूवार) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. दर्शन बच्चा शंकर, पारस गौरदिपे व अर्जून सिंह अशी मुलांची नाव आहे. तिघेही अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील कर्मचाऱ्यांची मुले आहेत. कंपनीच्या खड्ड्याजवळ त्या मुलांचे कपडे आढळून आल्याने त्यांचा खड्यात बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यापैकी आज (शुक्रवार) सकाळी तिघांचेही मृतदेह आढळून आले आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, कोरपना तालुक्यकात गडचांदूर शहराजवळ अल्ट्राटेक सिमेंट कंपनी कार्यरत आहे. याच कंपनीच्या आवारात कंपनीने मोठमोठे खड्डे खोदले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असते. शिवाय खड्डेही खोल आहेत. काल (गुरूवार) प्रजासत्ताक दिन असल्याने सकाळी घ्वाजारोहण पार पडले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास बारा वर्षाखालील तीन मुले दर्शन बच्चा शंकर, पारस गौरदिपे व अर्जून सिंह हे पोहण्याच्या उदेश्याने गेले. पोहताना त्यांना खोल खड्डयांचा अंदाज न आल्याने ते पाण्याने तुडूंब भरलेल्या खड्यात बुडाले.

अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील असल्याने ते घरी लवकर परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बद्दल विचारपूस करण्यात आली. शोधाशोध करण्यात आल्याोहने तिन्ही मुलांचे सायंकाळच्या सुमारास त्या खड्याजवळ कपडे आढळून आल्याने तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. कंपनी व्यवस्थापन व गडचांदूर पोलिसांना माहिती दिली. मात्र तोपर्यंत रात्र झाल्यामुळे मुलांचा शोध घेता आला नाही. आज पुहा शोधमोहीम सुरू करून सकाळी दर्शन बच्चा शंकर, पारस गौरदीपे, अर्जुन सिंह या तिघांचे मृतदेह आढळून आले. त्यांचा मृतदेह गडचांदूर पोलिसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरीता गडचांदरू ग्रामीण रूग्णालयात पाठविला. तिन्ही मुले हे अल्ट्राटेक कॉलनीतील कर्मचाऱ्यांची आहेत. या घटनेमुळे गडचांदूर अल्ट्राटेक वसाहतीवर शोकळा पसरली आहे.

हेही वाचा : 

Back to top button