चंद्रपूर : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंमुर्डे यांचे मरणोत्तर देहदान | पुढारी

चंद्रपूर : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंमुर्डे यांचे मरणोत्तर देहदान

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रातून दोनदा प्रतिनिधीत्व करीत महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर विठ्ठलराव टेमुर्डे यांचे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मरणोत्तर देहदान करण्यात आले आहे. ८० वर्षीय टेंमुर्डे यांनी देहदानाचा एक दशकापूर्वी घेतलेला निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

टेंमुर्डे १९८५ ते १९९० व १९९० ते १९९५ असे सलग दोनदा भद्रावती वरोरा विधानसभा मतदार क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले होते. १९ जुलै १९९१ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतीपदी त्यांची निवड झाली होती. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव रविवारी (दि. २२)सकाळी त्यांच्या वरोरा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या चाहत्यांनी, आप्तेष्टांनी तसेच नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शनाकरीता एकच गर्दी केली होती. टेमुर्डे यांनी एक दशकांपूर्वी मरणोत्तर देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचे पार्थिव चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुपूर्द करण्यात आले.

रक्तदानासाठी लोकांचा सहभाग वाढलेला आहे. नेत्रदानासाठीसुद्धा लोक पुढे येत आहेत. अवयव दानाचेही महत्त्व वाढताना दिसत आहे. काहीजण देहदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवताना आपण अनुभवतो पण राजकारणी व्यक्तींनी देहदान करण्याची घटना तशी दुर्मिळच आहे. अॅड मोरेश्वर टेमुर्डे यांनी एक दशकापूर्वी घेतलेला निर्णय क्रांतिकारी आणि प्रेरणादायी ठरला आहे.

मृत्यूनंतर देह जाळला किंवा पुरला जातो. यात देहाची राख किंवा माती होते. धड जाळल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. मृत्यूनंतर आपला देह इतर सहा जणांना उपयोगी पडू शकतो. त्यांना जीवदान मिळू शकते, हे त्यांनी जाणले होते. मातीत जाणारा देह दानातून इतरांच्या उपयोगात आणण्याची कल्पनाच सुखावणारी आहे. अंधश्रद्धा आणि जुन्या अनिष्ट रूढी परंपरेला तिलांजली देऊन देहदानासाठी मोरेश्वर टेमुर्डे यांनी घेतलेली भूमिका राजकारण्यांसाठी निश्चितच अनुकरणीय आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button