अमरावती : नांदगाव पेठ येथील संतप्त नागरिकांनी टोल नाका पाडला बंद | पुढारी

अमरावती : नांदगाव पेठ येथील संतप्त नागरिकांनी टोल नाका पाडला बंद

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : सुविधा न देता मनमानी आणि हेकेखोरपणा करणाऱ्या आयआरबी प्रशासनाच्या विरोधात संतप्त नांदगाव पेठवासीयांनी टोलनाक्यावर धडक मोर्चा काढत टोल नाका अर्ध्या तासासाठी बंद केला होता. यावेळी नागरिकांनी टोल प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. काही वेळ टोलनाक्यावर तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे तणाव निवळण्यात आला. आयआरबी अधिकाऱ्यांनी आंदोलकांपुढे येण्याचे धाडस दाखवले नाही. मात्र सोमवारी याबाबत आयआरबी आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये चर्चा घडवून आणण्याचे व तोडगा काढण्याचे आश्वासन पोलिसांच्या वतीने देण्यात आले.

परिसरातील वीस किलोमीटरच्या वाहनांना टोल लावला जातो. महामार्गाच्या लगत बांधकाम करावयाचे असल्यास ७५ मीटर अंतर राखून बांधकाम करण्याच्या नियमाला तिलांजली देत महामार्ग प्राधिकरणाने मनमानी करत महामार्गाच्या अगदी बाजूला मिनी रेस्टॉरंट बांधली. गावातील बोगद्यामध्ये लाईटची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रस्ते, नाली यांची दुर्दशा झालेली आहे. प्रवासी निवारा रखडलेला आहे. अशा विविध समस्या नागरिकांनी ग्रामसभेत मांडल्या. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना नागरिकांच्या वतीने जाब विचारण्यात आला. त्यावेळी आयआरबी अधिकारी ग्रामपंचायतचे पत्र स्वीकारत नाही. व उत्तर सुद्धा देत नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी दिल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार यांनी ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांना टोल नाक्यावर चालण्याची विनंती केली.

या विनंती नंतर अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह दोनशे नागरिकांचा ताफा टोल नाक्यावर आला. मात्र, अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त नागरिकांनी टोल कर्मचाऱ्यांना बाजूला करून टोलचे कामकाज बंद पाडले, अर्धा तास वाहने विनामूल्य सोडण्यात आली, टोल प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. गावकऱ्यांचा रोष बघून आयआरबी अधिकारी टोल नाक्यावर येण्यास धजावले नाहीत. अखेर याप्रकरणाची माहिती नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, दत्ता देसाई यांना मिळताच तातडीने टोल नाक्यावर दाखल झाले. आंदोलकांशी चर्चा करून तणाव निवळण्यात आला. मात्र आयआरबी अधिकारी येईपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. मात्र. भ्रमणध्वनीवर अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर सोमवारी याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन पोलिसांनी आंदोलकांना दिले.

माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार, शशी बैस, प्रा. मोरेश्वर इंगळे, सत्यजित राठोड, मंगेश गाडगे, राजेंद्र तुळे, मनीष दुधे, स्वप्नील देशमुख, सरपंच कविता डांगे, विनोद डांगे, जगदीश इंगोले, वृषाली इंगळे आशा चंदेल, पंकज शेंडे, अमित यादव, अमोल व्यवहारे आदीसह शेकडो गावकरी मंडळी या आंदोलनात सहभागी झाली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button