उ. प्रदेशात बँक लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अमरावतीत अटक | पुढारी

उ. प्रदेशात बँक लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अमरावतीत अटक

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यातील बँकेतील ३२ लाख लुटून पसार झालेला कटर गँगचा म्होरक्या सुरेश काशिनाथ उमक (वय ५८) याने अमरावतीत दोन साथीदारांसह खोट्या नावाने आश्रय घेतला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी उमकसह एकूण तिघांना अमरावती येथे अटक केली. तसेच आरोपीकडून अडीच लाखांची रोकडही जप्‍त केली आहे.

लखीमपूर येथील कोतवाली ठाण्याच्या हद्दीत जिल्हा बँक आहे. १३ ते १५ जानेवारी या काळात बँक बंद होती. १६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी बँक उघडण्यासाठी कर्मचारी, अधिकारी आले. यावेळी त्यांना बँकेच्या तिजोरीतील ३२ लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे आढळले. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक पोलिसांनी केलेला तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लुटमारीचा संशय उमक चालवीत असलेल्या कटर गँगकडे गेला.

सुरेश उमक अमरावतीत असल्याच्या माहितीवरून तीन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी अमरावती गुन्हे शाखेच्या मदतीने शहरात शोध मोहीम सुरू केली होती. उमक साथीदारासह शहरातील स्वस्तिकनगर येथे भाडयाच्या खोलीत सागर देशमुख या नावाने राहत होता. येथून उमक आणि त्याच्या साथीदाराला अमरावतीच्या गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. लखीमपूर येथील जिल्हा बँक लुटल्यानंतर कटर गँगमधील सदस्यांमध्ये समसमान वाटप झाले होते. त्यापैकी अमरावतीत लपून बसलेल्या उमक याच्या ताब्यातून गुन्ह्यातील अडीच लाख रूपये उत्तर प्रदेश पोलिसांनी जप्त केले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button