Amravati Jail : येरवडातील कैद्यांचा अमरावती कारागृहात धुमाकूळ | पुढारी

Amravati Jail : येरवडातील कैद्यांचा अमरावती कारागृहात धुमाकूळ

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : अमरावती कारागृहातील (Amravati Jail)  बंदींची संख्या आधीच जास्त असताना बाहेरून प्रशासकीय कारणावरून आलेल्या बंदींनाही येथे ठेवले जाते. येरवडा कारागृहातून काही बंदींना अमरावती कारागृहात स्थानांतरीत केले आहे. या बंदींचा येथील काही जणांशी वाद झाल्याने त्यांच्यात झटापट झाली. फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणात झटापट करणाऱ्या एकूण आठ बंदींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अजय भागवत घाडगे, अक्षय सतीश सोनसे, आकाश भगवान मिरे, आशिष नवनाथ डाकले, अर्जुन दशरथ मसके, प्रज्योत पांडुरंग तले, अभिषेक नारायण खोड व अमीर इलियाद मुजावर अशी गुन्हा दाखल झालेल्या बंदींची नावे (Amravati Jail)  आहेत.

ऋषिकेश मोडक व भारत घुगे हे दोन बंदी प्राणघातक हल्ला प्रकरणात न्यायाधीन बंदी म्हणून अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात बराक क्रमांक १६ व १४ मध्ये आहेत. येरवडा कारागृह येथून ऑगस्ट २०२२ मध्येच प्रशासकीय कारणास्तव २० बंदींना अमरावती कारागृहात पाठविण्यात आले होते.

शनिवारी (दि.२१) सायंकाळी बराक १४ मधील न्यायाधीन बंदी लखन गणेश शेरेकर व ऋषिकेश मोडक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी ऋषिकेश सोबत राहणारा दुसरा बंदी भारत घुगे तेथे पोहोचला. बंदींमध्ये वाद सुरू असताना अचानक येरवडा कारागृहातून आलेले ८ बंदी तेथे पोहोचले, त्यांनी मोडक व घुगे या दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी त्यांचा वाद मिटविला. कारागृहातील सुभेदार प्रल्हाद इंगळे यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी येरवडा कारागृहातील आठही बंदींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

झटापट घालणारे बंदी ऐकत नसल्याचे बघून ड्युटीवरील कर्मचाऱ्याने शिट्टी वाजवली. त्यानंतर इतर कर्मचारी, अधिकारी बराकीजवळ आले. झटापट करणाऱ्या बंदींना आटोक्यात आणण्यासाठी कारागृह पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. बंदींना अतिसुरक्षा कक्षात ठेवले. पुन्हा वाद होऊ नये, यादृष्टीने कारागृह प्रशासनाने मारहाण करणाऱ्या बंदींना अतिसुरक्षा विभागात ठेवले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button