अमरावती : पाठिंबा देण्यासाठी पदवीधर उमेदवारावर प्राणघातक हल्ला, आरोपी पसार | पुढारी

अमरावती : पाठिंबा देण्यासाठी पदवीधर उमेदवारावर प्राणघातक हल्ला, आरोपी पसार

अमरावती : पुढारी वृत्तसेवा – अमरावती पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. यामध्ये अपक्ष उमेदवार विकेश गोकुल गवाले हे सोमवारी प्रचारार्थ मोर्शी येथे जाताना माहुली जहागीर नजीक त्यांना काही अज्ञात इसमांनी पाठिंबा देण्यासाठी वाद घातला. त्यावेळी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. यामध्ये विकेश गवाले किरकोळ जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही वेळ ते घाबरलेले होते. स्वतःची सुटका करत ते वाहनाने माहुली जहागीर येथे पोहोचले आणि तेथील काही नागरिकांनी त्यांना लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या घटनेने एकच खळबळ उडाली असून नातेवाईकांनी रुग्णालयावर धडक देत घटनेचा निषेध केला.

विकेश गवाले हे अमरावती येथील खासगी बँकेत नोकरीला आहेत. रहाटगाव येथील वृंदावन अपार्टमेंट येथे वास्तव्यास आहे. अमरावती पदवीधर निवडणुकीमध्ये ते अपक्ष उमेदवार आहे. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आपले चारचाकी वाहन क्र. एम. एच.२७ डी. ई.६३९१ ने ते मोर्शी येथे प्रचारासाठी जात होते. त्यांना माहुली जहागीर पुढे रेल्वे पुलाजवळ चार अज्ञात इसमांनी हात दाखवून वाहन थांबविले. पाठिंबा देण्यावरून वाद निर्माण झाल्यावर त्यातील एकाने विकेश गवाले यांना मारहाण करायला सुरुवात केली. गवाले यांनी तातडीने गाडी सुरू करून घटनास्थळावरून जीव वाचवत वाहन माहुलीच्या दिशेने वळवले. माहुलीच्या बस स्टँडवर येताच त्यांनी नागरिकांना घटनाक्रम सांगितला. नागरिकांनी लगेच त्यांना माहुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

माहुली येथील आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती माहुली जहागीर पोलिसांना देण्यात आली. मात्र पोलिस तासभर घटनास्थळी तसेच रुग्णालयात पोहचले नसल्याने नातेवाईकांनी पोलिस स्टेशन गाठून लेखी तक्रार दिली.

Back to top button