२०४७ पर्यंत काँग्रेसचे दिवस वाईटच : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजप २०२४ च्या निवडणुकीसाठी कामाला लागला असताना काँग्रेसला २०४७ पर्यंत भवितव्य नसल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपूर येथे माध्यमांशी ते बोलत होते. यापूर्वी विदर्भात १० लोकसभा मतदारसंघ असताना त्यांनी आम्ही 11 जागा जिंकणार, असा दावा प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्ताने केला होता.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव जाणवत असल्याने नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. काँग्रेसमध्ये बूथ लेव्हलपर्यंत कुणीही काम करायला तयार नाही. त्यांना हे समजून चुकले की, २०४७ पर्यंत काँग्रेसला काही चांगले दिवस नाहीत. त्यामुळे ३० वर्ष काँग्रेसमध्ये राहून कुणालाही आयुष्य खर्ची घालवायचे नाही. काँग्रेसमध्ये नेत्यांचा मुलगाच आमदार होऊ शकतो. मंत्र्याचा मुलगाच मंत्री होऊ शकतो. अजूनही नेते आपापल्या मुलांना प्रमोट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे छोटे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
सत्यजीत तांबेंकडून अद्याप पाठिंब्याची मागणी नाही
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल करणारे काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांना भाजप पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु असली तरी अद्याप त्यावर कुठलाच निर्णय झालेला नाही. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, तांबे यांनी अजून कुठलेही समर्थन मागितलेले नाही. तांबे यांनी समर्थन मागितल्यास भाजप त्यावर नक्कीच विचार करेल. केंद्रीय संसदीय समितीकडे तशी संमती मागू. तूर्तास ते अपक्षाच्याच भूमिकेत आहेत. महाविकास आघाडीचे ‘एक दिल के टुकडे हुए हजार, कही कहा गिरा, कही कहा गिरा’ अशी अवस्था झाली असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.