‘प्रदेशाध्यक्ष बदला, काँग्रेस वाचवा’, आशिष देशमुखांची काँग्रेस अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी | पुढारी

‘प्रदेशाध्यक्ष बदला, काँग्रेस वाचवा’, आशिष देशमुखांची काँग्रेस अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्याकडे सोपविण्यात आली. तेव्हापासून पक्षाची सतत नाचक्की, वाताहत सुरु आहे. राज्यात पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावरही जाण्याची भीती आहे. राज्यातील काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक असून प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तात्काळ बदला, काँग्रेसला वाचवा, अशी मागणी काँग्रेसचे विदर्भतील नेते व माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र पाठवून केली आहे.

महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये फिरून लोकांचे प्रश्न जाणून घेणारा व काँग्रेस मजबूत करणारा प्रदेशाध्यक्ष हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आशिष देशमुख हे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे सुपुत्र आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पाठविलेल्या पत्रात आशिष देशमुख यांनी म्हटले आहे की, पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची दाणादाण झाली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची वाताहत सुरुच आहे.

विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशैलीमुळे हा बालेकिल्ला आता काँग्रेसच्या हातातून निसटला आहे. ज्या काँग्रेसची पाळेमुळे शहरांपासून तर ग्रामीण भागांपर्यंत रोवली गेली होती, त्या पक्षाकडे आता कार्यकर्तेच उरलेले नाहीत. पक्षांतर्गत गटबाजी हा मोठा प्रश्न राज्यातील काँग्रेससमोर उभा ठाकला आहे. संघटनेची घडी विस्कळीत झालेली आहे. आज संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस असे अनेक पक्ष राज्यात प्रभावशाली होत आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिति सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काळ बदलण्याची गरज आहे. कॉंग्रेसच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या पत्राची तातडीने गंभीर दाखल घ्यावी, अशी विनंती करीत देशमुख यांनी घरचा आहेर दिला आहे.
अलीकडेच नागपुरात काँग्रेसच्या हात जोडो अभियानाच्या बैठकीच्या वेळीच देशमुख यांनी हात जोडो पेक्षा नेत्यांचे दिल जोडो.. अभियान महत्वाचे असल्याचा सूर लावत प्रदेशाध्यक्ष पटोले यांना लक्ष्य केले होते.

     हेही वाचलंत का ?

Back to top button