swine flu : कोरोना, डेंग्यूनंतर विदर्भात स्वाईन फ्लूचा धोका, रुग्णसंख्येत अचानक वाढ | पुढारी

swine flu : कोरोना, डेंग्यूनंतर विदर्भात स्वाईन फ्लूचा धोका, रुग्णसंख्येत अचानक वाढ

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना च्या रुग्णसंख्येत घट झाली असतानाच नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे (swine flu) रूग्ण आढळल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. नागपुर विभागात स्वाईन फ्लूचे (swine flu) सहा रूग्ण आढळले आहे. आधी कोरोना नंतर म्युकरमायकोसिस आणि डेंग्यू या आजारानंतर आता स्वाईन फ्लू या आजाराने डोके वर काढले आहे.

गेल्यावर्षी या आजाराचा नागपूर विभागात एकही रुग्ण नसताना यंदा महिन्याभराच्या काळात येथे सहा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. परंतु या रुग्णाच्या मृत्यूच्या अंकेक्षणानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

भंडारा जिल्ह्यातील रुग्ण

स्वाईन फ्लू असताना दगावलेला हा पुरुष रुग्ण भंडारा जिल्ह्य़ातील आहे. त्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वी नागपुरातील एका खासगी रुग्णालयात झाला. हे प्रकरण मृत्यू अंकेक्षण समितीपुढे गेल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पूर्व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्य़ांत मोठय़ा संख्येने डेंग्यूसह हिवतापाचे रुग्ण आढळत आहेत.

या आजाराने नागरिक बेजार असतानाच आता स्वाईन फ्लू आजाराचे रुग्ण आढळले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीनुसार, गेल्या महिन्याभरात नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे ६ रुग्ण आढळले. त्यात ४ पुरुष तर २ महिलांचा समावेश आहे.

नागपूर जिल्ह्य़ातील लॉ कॉलेज चौक, जरीपटका, रेल्वे कॉलनी परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. याशिवाय हिंगणघाटला १ आणि भंडारा जिल्ह्य़ात २ रुग्ण आढळले. एकूण रुग्णांतील दोन गंभीर रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत.

Back to top button