चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : माझ्याविरोधात ईडी लावू शकत नाही. बदनामीचा प्रयत्न केला, तो ही फसला. माझ्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नाहीत. तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे तुमचा अपघात घडविला जावू शकतो, असे अधिकारी सांगतात, असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
चंद्रपुरातील सामाजिक संघटनांच्यावतीने महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर चंद्रपुरात व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी त्यांनी हा गौप्य स्फोट केला. इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ए.पी. पिल्लई उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून सुषमा अंधारे, दिलीप सोळंकी, तर विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी आमदार मोरेश्वर टेमुर्डे उपस्थित होते.
तुमच्या मनपलटावरील महापुरुष पुसून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्याऐवजी महापुरुष म्हणून हेडगेवार आणि गोळवलकर अशी नावे स्थापित करायची आहेत, असे अंधारे यावेळी म्हणाल्या. देशात प्रश्न विचारणे गुन्हा झाला आहे. मुलभूत प्रश्नांकडे लोकांचे लक्ष जावू नये, यासाठी दररोज नवे वाद जाणीपूर्वक निर्माण केले जातात. मी तर्काच्या आधारावर बोलले की माझी तिरडी काढली जाते. परंतु, राज्यपाल सावित्रीमाई बद्दल आक्षेपार्ह बोलतात. तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प असतात. ज्या महापुरुषांनी आम्हाला सन्मान दिला. त्यांचा आपण सन्मान राखू शकत नाही. मग आपला सन्मान कोण ठेवणार, असा सवाल यावेळी अंधारे यांनी केला.
महाषुरुषांच्या स्वप्नातील भारत राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर आहे. मात्र, सध्या घटनाच धोक्यात आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाचा अधिकारच आता घटना वाचवू शकले, असे अंधारे म्हणाल्या.
-हेही वाचा