चंद्रपूर : ब्रम्हपूरी तालुक्यात वाघिणीचा विहिरीत पडून मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : ब्रम्हपूरी तालुक्यात वाघिणीचा विहिरीत पडून मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : शेतशिवारातील विहीरीत एका पाच वर्ष वयाच्या वाघिणीचा विहीरीत पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.४) सकाळी ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी येथील शेतशिवारात उघडकीस आली. वनाधिका-यांनी वाघिणीला विहीरीबाहेर काढून पंचनामा केला आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपूरी मेंडकी नियत क्षेत्रातील मेंडकी येथील रामाजी ठाकरे यांच्या गट क्रमांक ४५१ शेतातील विहिरीत वाघिण पडून असल्याचे काही नागरिकांना दुर्गंधी सुटल्यावरून लक्षात आले. त्यानंतर वनरक्षक लाडे यांनी परिसरातील शेतातील विहिरीत पाहणी केली असता वाघिण मृतावस्थेत आढळून आली. ही वाघिण अंदाजे ५ वर्षे वयाची आहे. तीन चार दिवसांपूर्वी वाघिणीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.

उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, क्षेत्र सहाय्यक शेंदुरकर, वनपरिक्षेत्राधिकारी सालकर, मानद वन्यजीव संरक्षक विवेक करंबेकर, इको प्रो अध्यक्ष बंडू धोतरे, यांच्या उपस्थितीत वाघिणीला विहीरीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. पशुधन विकास अधिकारी डॉ.लोंढे मॅडम, पशुधन विकास अधिकारी डॉ.पराते, पशुधन विकास अधिकारी डॉ. लाडे यांनी शविच्छेदन केले.

हेही वाचलंत का?

Back to top button