Winter Session : भूखंड घ्या, कुणी गायरान घ्या…; विरोधकांचे टाळ वाजवित, फुगड्यांचा फेर धरत आंदोलन | पुढारी

Winter Session : भूखंड घ्या, कुणी गायरान घ्या...; विरोधकांचे टाळ वाजवित, फुगड्यांचा फेर धरत आंदोलन

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : भूखंड घ्या कुणी गायरान घ्या, असे भजन करीत विरोधकांनी मंगळवारी विधानभवन (Winter Session)  परिसरात लक्ष वेधले. हातात टाळ घेतलेल्या या आमदारांनी फुगडीचा फेरही धरला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटातील आमदार टाळ वाजवून आंदोलन करताना सरकारविरोधात घोषणाही देत होते. अगदी वारकऱ्यांप्रमाणे भजन म्हणत महाविकास आघाडी तर्फे सरकार विरोधात टाळ वाजवा व दिंडी आंदोलन करण्यात आले.

विधिमंडळ अधिवेशनाच्या (Winter Session)  दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने सरकारविरोधात भूखंड घ्या.. कुणी गायरान घ्या… खोक्यानं घ्या… कुणी खोऱ्यानं घ्या…, कुणी गुवाहाटीला जा… कुणी सुरतला जा…, असे भजन गात सत्ताधारी पक्षाविरोधात सूर आळवला. विधिमंडळ अधिवेशनाचा कालचा दिवस सीमाप्रश्न, भूखंड घोटाळा आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीवरून विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या तू तू – मै मै ने गाजला. तर, आज सकाळी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर अभंग गात आंदोलन केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, संजय राठोड यांचा निषेध केला. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळील काँग्रेस कार्यालयाजवळून फुगड्या घालत, रिंगण करीत व अभंग गात या निषेध मोर्चाला सुरुवात झाली. सर्व आमदारांनी डोक्यात पांढऱ्या टोप्या परिधान करून टाळ वाजवत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मोदी का नाम जपना, पराया माल अपना, लवकर लुटा तुम्ही लवकर लुटा, महाराष्ट्राला लुटा तुम्ही जनतेला लुटा, गुवाहाटीला चला तुम्ही सुरतेला चला, खोके घ्यायला चला.. अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात नंतर विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रोहित पवार, आदित्य ठाकरे, यशोमती ठाकूर, नाना पटोले, अमोल मिटकरी, भास्कर जाधव, प्राजक्त तनपुरे सहभागी झाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button