सीमाप्रश्नाबद्दल आम्हाला इतरांनी शिकवायची गरज नाही : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

सीमाप्रश्नाबद्दल आम्हाला इतरांनी शिकवायची गरज नाही : मुख्यमंत्री शिंदे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र, कर्नाटक सीमाआंदोलनात मी स्वतः तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे इतरांनी आम्हाला याबाबत शिकविण्याची गरज नाही. आम्ही सरकार म्हणून सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सीमावासीयांबाबतचा ठराव उद्याच विधिमंडळात घेणार आहोत, असा निर्वाळा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे सोमवारी नवी दिल्लीत बोलत होते. ते म्हणाले, आज दिल्लीत वीर बालदिवस होता. त्यामुळेच मला केंद्र सरकारच्या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. मात्र, मला वारंवार दिल्लीवार्‍या कराव्या लागतात असे म्हणणार्‍यांनी नेमकी माहितीच घेतली नाही. त्यांनी याची माहिती घ्यायला हवी होती की, कुठल्या कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आलो आहेे.

सीमावादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच यामध्ये हस्तक्षेप केला व दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी बोलावले. हे प्रकरण न्यायालयात असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत शहा यांनी सूचना दिल्या. मुळातच सीमावादाचा हा विषय साठ वर्षे जुना आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सत्तारप्रकरणी माहिती घेणार

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन भूखंड प्रकरणात आरोप होत आहे. त्यांच्या प्रकरणाची माहिती आपण घेणार आहोत. तसेच विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणांचीही माहितीही घेतली जाईल. त्यानंतर पुढे काय ते ठरवले जाईल.

Back to top button