विदर्भाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसली; वेगळा विदर्भ ही काळाची गरज-प्रकाश मारकवार | पुढारी

विदर्भाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसली; वेगळा विदर्भ ही काळाची गरज-प्रकाश मारकवार

चंद्रपूर;पुढारी वृत्तसेवा: विदर्भ वैधानिक विकास मंडळाने नेहमी विदर्भाच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. त्यामुळे विदर्भा्च्या वाट्याला उपेक्षेशिवाय काहीच आलेले नाही. त्यासाठी वेगळा विदर्भ हीच काळाची गरज असल्याचे मत येथील विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य प्रकाश पाटील मारकवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मांडले आहे.

विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना 1994 मध्ये करण्यात आली. या मंडळाचा मुख्य उद्देश विदर्भाचा अनुशेष भरून काढणे हा होता. या मंडळात राज्यपाल अध्यक्ष व पाच अशासकीय सदस्य होते. परंतु राज्यपाल यांना सर्व अधिकार असूनही या मंडळाला कधीही पुरेसा निधी मिळाला नाही. ज्यामुळे विदर्भाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत गेला.

चंद्रपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील हे या मंडळाचे सदस्य होते. त्यांनी त्यावेळेस मंडळास निधीची तरतूद होत नाही. ही बाब प्रकर्षाने राज्यसरकारच्या निदर्शनास आणून दिली. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचा अनुशेष काढून विदर्भाला पुरेसा निधी उपलब्ध करणे हा हेतू कुठेही साध्य झाला नाही.

विदर्भ वेगळा झाला तरच सक्षम होऊ शकतो. नागपूर करारापासून ते केळकर समितीपर्यंत सगळ्यामधून विदर्भाचे मागासलेपण आणि या प्रदेशावर झालेला अन्याय अधोरेखित करण्यात आला आहे. विदर्भाला कधीही लोकसंख्येच्या प्रमाणात निधी आणि विकासाच्या संधी मिळाल्या नाहीत. याउलट स्वतंत्र झालेल्या छत्तीसगड , तेलंगाना यासारख्या राज्यांनी लहान राज्याचाही विकास होऊ शकतो हे सिद्ध केले आहे. त्यामुळे आता विदर्भाच्या विकासासाठी वेगळे राज्य हाच एकमेव पर्याय उरला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी स्थापन केलेल्या योजना आयोगाच्या अभ्यास गटांनीही जाणूनबुजून विदर्भावर अन्याय केल्याचे अधोरेखित केले आहे. औद्योगीकरण नसल्याने शहरी भागाचा तर कृषी आणि सिंचन नसल्याने विदर्भाच्या ग्रामीण भागाचा विकास खुंटला. छोट्या राज्याचा विकास दर हा मोठ्या राज्यांच्या विकास दरापेक्षा दुप्पट असतो. विदर्भ वेगळा झाल्यास एक छोटे राज्य निर्माण होऊन विकास दर वाढेल.

विदर्भात खनिज,कोळसा,नद्या ,जंगल,जमीन भरपूर प्रमाणात आहेत तसेच कापूस ,धान,संत्रा इत्यादी प्रमुख पिके आहेत. विदर्भाची खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर विदर्भ वैधानिक विकास मंडळ बरखास्त करून वेगळा विदर्भ राज्याची स्थापना करणे हा एकमेव पर्याय आहे, असे मत विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य प्रकाश पाटील मारकवार यांनी व्यक्त केले.

Back to top button