

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : आज ज्या लोकांना तालुक्याचा पुळका आलाय आणि प्रश्न आठवलेत, ते मागील अडीच वर्षांत सत्ता असताना कुठे होते? कोण कसा आहे, ते बघायचे असेल तर त्यांच्या गावात जाऊन चौकशी करा. मग हे कोण आहेत ते समजेल. विखेंनी मोठाल्या लोकांना सोडले नाही, तेथे हे कोण लागून गेले. यांचे खरे चेहरे कसे आहेत, ते योग्य वेळी बाहेर काढू, असा इशारा खा.डॉ. सुजय विखे यांनी आमदार नीलेश लंके यांचा नामोल्लेख टाळून दिला. वेळ आल्यावर त्यांना नाव घेऊन ठोकेल, असेही विखे म्हणाले.
पाथर्डीतील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित एका कार्यक्रमात खा.विखे बोलत होते. आमदार लंके यांच्या आंदोलनानंतर प्रथमच खा. विखे तालुका दौर्यावर आल्याने त्यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. या वेळी व्यासपीठावर अभय आव्हाड, गोकुळ दौंड, डॉ. मृत्युंजय गर्जे, देविदास खेडकर, अजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, बंडू बोरुडे, मधुकर आघाव, मंगल कोकाटे, संजय फुंदे, दत्ता दराडे, सुनील उगले, अक्षय शिरसाट होते.
खा. विखे म्हणाले, सत्ता असताना त्यांना या खराब रस्त्यांची जाणीव झाली नाही. सतत फोनवर असतात आणि तो व्हिडिओ काढून सोंग घेण्याचे काम सध्या करत आहेत. जे लोक दिसतात, वागतात स्वतःची प्रतिमा गरीब जनतेचे कैवारी म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतात, त्यांची काय प्रतिमा आहे, हे येणार्या काळात सगळ्यांपुढे आणू.
ज्या दिवशी माझ्या टप्प्यात येतील, त्यादिवशी नाव घेऊन हिशेब पूर्ण करणारा सुजय विखे पाटील आहे, अशा शब्दात खासदार विखे यांनी विरोधकांवर शरसंधान केले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. अजय रक्ताटे यांनी आभार मानले.
'..तर आमचे कार्यकर्ते कर्तुत्त्वाने मोठे झालेले'
डॉ. सुजय विखे म्हणाले, चार दिवस उपोषण करूनही वजन घटत नाही, हे पूर्ण जिल्ह्याने पहिले आहे. कोण कधी जेवले, याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. रस्त्याचे खरे काम कोणी केले, याचे उत्तर येणार्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत देऊ. विरोधकांच्या व्यासपीठावरील अनेक कार्यकर्ते हे तडीपार झालेले आहेत. तर, आमच्या व्यासपीठावर असणारे कार्यकर्ते हे कर्तृत्वाने मोठे झालेले आहेत.