‘त्या’ ट्विटमागे काँग्रेसचा हात? : एकनाथ शिंदेंना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा फोन

नागपूर : उदय तानपाठक – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून रण पेटले असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती हाती आली आहे. कर्नाटकमधील मराठी माणसांना त्रास झाल्यास महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असून तुम्ही तसे होऊ देऊ नका, अशी विनंती शिंदे यांनी बोम्मई यांना केल्याचे समजते. बोम्मई यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कळते. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने करण्यात आलेले ‘ते’ बोगस वादग्रस्त ट्विट करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ( Maharashtra-Karnataka border row )
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असताना सीमाप्रश्नासह अन्य विषयांवर सरकारची कोंडी करण्याचे विरोधी पक्षांनी ठरवले आहे. सीमाप्रश्न पुन्हा एकदा चिघळला असून, कर्नाटक सरकारकडून अजूनही वाद उकरून काढले जात आहेत. या प्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली, तेव्हा दोन्ही राज्यांच्या तीन तीन मंत्र्यांचा समावेश असलेली समिती नेमून तोडगा काढण्याचा निर्णय झाला होता. ( Maharashtra-Karnataka border row )
बोगस अकाऊंटवरून ट्विट करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता ?
रविवारी ( दि. १८ ) रात्री उशिरा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी काही खासदार ‘रामगिरी’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते, असे समजते. बोम्मई यांनी समितीसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली. मात्र त्याचवेळी शिंदे यांनी सीमेवरील महाराष्ट्रातील गावांच्या संदर्भात होत असलेल्या वक्तव्याचा विषय काढला. बोम्मई यांनी ‘ते’ वादग्रस्त ट्विट आपले नसून बोगस अकाऊंटवरून ते केले गेल्याचे अमित शहा यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट केले होते. या ट्विट करणार्याचा शोध लागला असून, तो काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहीती हाती आली असून येत्या एक-दोन दिवसांतच त्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
- बेळगावात हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ; सभागृहात स्वा. सावरकर यांचा फोटो लावण्यावरून वाद
- Maharashtra Winter Session :सीमावादाचे नागपुरातील विधिमंडळात पडसाद; …तर ॲक्शनला रिॲक्शन होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Maharashtra Winter Session 2022 : ‘५० खोके एकदम ओके’…विधीमंडळाबाहेर विरोधकांची घोषणाबाजी (व्हिडिओ)