फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याची हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. आपण प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे मोठे विधान बावनकुळे यांनी केले.

पूर्व नागपुरात संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. फडणवीस यांनी त्यांच्याकडे न्यायासाठी आलेल्या प्रत्येकाला मदत केली. जो-जो समाज त्यांच्याकडे गेला, त्याना त्यांनी मदतच केली आहे. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे यावर बावनकुळे यांनी भर दिला.

राज्यात २०१४ ते २०१९ चा काळ पुन्हा आला पाहिजे, असे नमूद करून बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे काय झाले पाहिजे, असा सवाल करताच उपस्थितांनी मुख्यमंत्री असे उत्तर दिले. बावनकुळे पुढे म्हणाले, किमान मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. महाराष्ट्राचे भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस हेच बदलू शकतात, असेही विधान त्यांनी केल्याने राजकीय वातावरण अधिवेशनपूर्वीच तापले आहे.

दरम्यान, याबद्धल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना विचारले असता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे उत्तर दिले. हा प्रश्न दोन पक्षांचा आहे, त्यात आम्ही नाक खुपसणार नसल्याचेही सांगितले.

.हेही वाचा 

पुणे जिल्ह्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीत 54 टक्के मतदान

नागपूर हिवाळी अधिवेशन : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार – अजित पवार

Nashik : दिंडोरी तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; सदाशिव गावितांसह शिवसैनिक शिंदे गटात

Back to top button