पुढारी ऑनलाईन: सध्या सरकारमध्ये काही समाधानकारक गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे आम्ही आनंदाने सरकारच्या चहापानासाठी जावे, अशी परिस्थिती नाही; त्यामुळे आम्ही सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकत आहे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. सोमवारपासून ( दि. १९) नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्ष नेते अजित पवार याच्या नेतृत्त्वाखाली पत्रकार परिषेद घेण्यात आली.
या वेळी अजित पवार म्हणाले की, "२०२४ ला काय होईल काय होणार. हे आत्ता सांगता येणार नाही, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. आम्ही ज्योतिष्याकडे जात नाही." भाजपने आमच्या नाकाखालून सरकार काढून घेतले असले तरी, आम्ही त्यांच्या पक्षात काय सुरू आहे यात नाक खुपासणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. भाजपने आमच्या नाकाखालून सरकार काढून घेतले असले तरी, आम्ही त्यांच्या पक्षात काय सुरू आहे यात नाक खुपासणार नाही असा पलटवार फडणवीस यांच्यावर केला.
दरम्यान या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील समस्या सोडवण्यावर दोन्ही बाजूने प्रयत्न होणे आवश्यक आहेत. त्यामुळे सध्याचे प्रश्न पाहता हिवाळी अधिवेशन हे जास्तीत जास्त तीन आठवड्यांचे घ्यावे अशी मागणी अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडे या परिषदेच्या माध्यमातून केली आहे.
आज राज्यात अनेक प्रश्न आहेत. वाचाळवीरांची बडबड काही केल्या थांबत नाही. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत नाही, राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाताय, सरकारकडून मोठ्या प्रमाणात कर्ज काढली जात असल्याचेही अजित पवार म्हणाले. तसेच या अधिवेशनात आम्हाला कोणत्याही प्रकारे गोंधळ घालायचा नाही अशी स्पष्ट भूमिका मविआच्या वतीने त्यांच्या परिषदेत मांडली.