भंडारा : कंटेनरची बसला धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी बचावले | पुढारी

भंडारा : कंटेनरची बसला धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी बचावले

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : भंडारा-तुमसर आणि गोंदिया-रामटेक मार्गातील एका चौकात भरधाव कंटेनरने एस.टी.बसला धडक दिली. या अपघातात यामध्ये एसटीतील विद्यार्थ्यांसह अन्य प्रवासी बचावले तर एसटी चालक, वाहक किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, भंडारा-तुमसर राज्य मार्ग २७१ व रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग खापा येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची दळणवळण असते. शनिवारी तुमसर बस स्थानकामधून तुमसर-अकोला एमएच ४० एक्यू ६२५५ क्रमांकाची बस २७ विद्यार्थी व प्रवाशांना घेवून भंडाराकडे निघाली होती. खापा चौफुली येथे रामटेकवरून कोळसा भरून येणा-या ट्रकने (क्र. एमएच ४० बीएल २५४८) बसला जोरदार धडक दिली. यात बसच्या समोरचा भागाचा चंदामेंदा झाला. अपघातात बसचालक वाहक किरकोळ जखमी झाले. २७ प्रवासी आणि विद्यार्थी थोडक्‍यात बचावले.

खापा चौकात नेहमी वर्दळ राहत असल्यामुळे हा चौक अपघातप्रवण स्थळ झाले आहे. चौकातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाल्‍याने अपघात वाढले आहेत. पोलीस, महसूल आणि बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेल्या महामार्गाचे संबंधित कंत्राटदार हे या अपघातांना जबाबदार आहेत, असे स्‍थानिकांनी सांगितले.

चार ते पाच वर्षापासून रामटेक, मनसर, तुमसर, गोंदिया सिमेंट रस्ता तयार होत असून, यात काही सुविधांचा अभाव असल्यामुळे नेहमी या चौकामध्ये अपघात होत असतात. संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी अपघाताकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

Back to top button