सांगली : खानापूरमध्‍ये ‘ग्रा.पं’साठी सरमिसळ आघाड्या; जनतेसह नेतेही संभ्रमात | पुढारी

सांगली : खानापूरमध्‍ये 'ग्रा.पं'साठी सरमिसळ आघाड्या; जनतेसह नेतेही संभ्रमात

विटा (सांगली), पुढारी वृत्‍तसेवा : राज्याच्या राजकारणात भाजप, काँग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादी,मनसे आदी प्रमुख पक्ष आहेत; परंतु हे सगळेच पक्ष आणि त्यातील छोटे गट एकमेकांच्या बरोबर आणि विरोधात उभे असल्याने खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये कमालीची राजकीय सरमिसळ झाली आहे. परिणामी निवडणुकी नंतर जिंकलेला गट नेमका कोणाचा असेल ? याबाबत जनतेबरोबरच नेत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

खानापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत गावागावात स्थानिक पातळीवरील वाद निर्माण झाल्‍याचे चित्र आहे. पक्षीय विचारधारा, ध्येय धोरणे, एकनिष्ठता अशा गोष्टी या निमित्ताने राजकारणात नाहीशा झाल्या आहेत. त्यातूनच अनेक ठिकाणी गावात असणारे एकाच गटाच्या दोन-दोन आघाड्या बनल्या आहेत. परिणामी एकाच गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकल्‍याचे दिसत आहेत.

वाळूज या ठिकाणी एका पॅनेलच्या पोस्टरवर चक्क आमदार अनिलराव बाबर आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे एकत्र फोटो छापले गेले आहेत. रेवणगावात आमदार बाबर आणि राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब मुळीक या दोन गटाने एकत्र येवून बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. जोंधळखिंडीत आमदार बाबर आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी अण्णा देशमुख यांचे गट एकत्रित लढत असणार आहे.

आळसंद येथे आमदार बाबर गट आणि आमदार गोपीचंद पडळकर समर्थक एकत्रित आहेत. भाळवणीतही माजी मंत्री विश्वजीत कदम आणि बाबर समर्थक एकत्रित आहेत. बेणापूरात कॉंग्रेस नेते सुहास शिंदे आणि आमदार बाबर समर्थक एकत्र आले आहेत. बलवडी (भा) मध्ये आमदार बाबर आणि आमदार अरुण लाड यांचे समर्थक एकत्र आले आहेत. सर्व प्रकार पाहता समोरून आल्यानंतर एकमेकाकडे न पाहणारे नेते सुध्दा काही गावात पोष्टरवर एकत्रित पहावयास मिळत आहे. यामुळे आता गावागावातील अशी सरमिसळ नेत्यांना सुद्धा संभ्रमित टाकताना दिसून येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button