Cycle Journey From Kashmir To Kanyakumari : ७३ वर्षीय पद्मश्री डॉ. किरण सेठ यांची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा | पुढारी

Cycle Journey From Kashmir To Kanyakumari : ७३ वर्षीय पद्मश्री डॉ. किरण सेठ यांची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय संस्कृतीशी युवा वर्गाची नाळ घट्ट करण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षण, आरोग्यदक्षता, महात्मा गांधींचे विचार रुजविणे हे काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रेचे उद्देश असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. किरण सेठ यांनी नुकतेच केले. महत्वकांक्षा मजबूत असेल आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर वय यशाच्या मार्गात अडसर ठरू शकत नाही, असाच आदर्श ७३ वर्षीय पद्मश्री डॉ. किरण सेठ यांनी दिल्याचे अनुभवास आले. (Cycle Journey From Kashmir To Kanyakumari)

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ पासून काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सुमारे ४६९१ कि.मी. सायकल यात्रेवर निघालेल्या डॉ. सेठ यांचा वरोरा समर्थित आनंदवनात आगमनप्रसंगी सत्कार करण्यात आला. देशवासीयांसाठी विशेषतः नवयुवकांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरलेल्या डॉ.सेठ यांनी आनंदवनात मुक्कामा दरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी हितगुज केली, पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. विकास आमटे यांच्याशी भेट घेऊन ते पुढील प्रवासाकरिता रवाना झाले.

स्पीक मॅकेचे संस्थापक पद्मश्री डॉ. किरण सेठ यांची ओळख नवयुवकांना भारतीय संस्कृती आणि पुरातन संगीताशी जोडणारी आहे. खरगपूरवरून मेकॅनिकल इंजिनिअर डिग्री प्राप्त डॉ. सेठ यांना भारतीय संस्कृतीबाबतच्या आकर्षणाने अमेरिकेवरुन भारतात खेचून आणण्यास बाध्य केले. त्यांनी आयआयटी दिल्ली मध्ये अनेक वर्षे प्रोफेसर म्हणून काम केले. भारतीय शास्त्रीय संगीत आणि परपंरेचे जतन आणि तरुणांमध्ये प्रचार प्रसारासाठी त्यांनी सन १९७७ साली स्पीक मॅकेची (सोसायटी फॉर दी प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमोंग्ज अमंगस्ट युथ) स्थापना केली. स्पीक मॅके देशातील ५०० शहरात कार्यरत असून २ हजार पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांशी जुळून आहे. वर्षातून ५ हजार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात, असे ही त्यांनी सांगितले.

आनंद निकेतन महाविद्यालयातील सभागृहात ‘मीट द प्रेस’ दरम्यान पत्रकारांशी बोलताना ७३ वर्षीय डॉ.सेठ यांनी सांगितले की, श्रीनगर मधून १५ आगस्ट २०२२ ला काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रेचा प्रारंभ झाला. पंजाब, उत्तराखंड, दिल्ली राजस्थान मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, केरळ तामिळनाडू या प्रदेशातून सुमारे १७० दिवसांची यात्रा करून ३० जानेवारी २०२३ ला कन्याकुमारीला यात्रेचे समापण होणार आहे. वरोरा येथे येण्यापूर्वीच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. भारताचा गौरवशाली वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी व देशवासीयांमध्ये सायकल प्रती जागरुकता उत्पन्न करण्याच्या उद्देशाने यापूर्वी ११ मार्च २०२२ रोजी राजघाट नवी दिल्ली ते जयपूर व पुढे टप्प्याटप्प्याने साबरमतीपर्यंत सायकल यात्रा त्यांनी काढली होती. या यात्रेच्या अनुभवातूनच पुढील काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सायकल यात्रेचे बळ मिळाले, असे त्यांनी नमूद केले. (Cycle Journey From Kashmir To Kanyakumari)

सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून व देशप्रेमाने भारावून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सायकल त्यांनी यात्रेतून नवयुवकांसमोर त्यांनी एक आदर्श ठेवला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे, महात्मा गांधी यांनी दिलेला सिद्धांत ‘साधे जीवन उच्च विचार’ यावर अमल करणे, भारताचा गौरवशाली सांस्कृतिक वारस्याचा उत्सव साजरा करणे, आरोग्यक्षमता, पर्यावरण संरक्षण व युवक – युवतींमध्ये फिटनेस बाबत जनजागृती करणे आणि अनेक नवीन स्वंयसेवक स्पीक मॅकेशी जोडण्याचा त्याचा प्रयास आहे. त्यादृष्टीने जागोजागी भेटीदरम्यान जनतेशी हितगुज करून त्यांना पर्यावरण संरक्षण व आरोग्यासाठी सायकल व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. डॉ.सेठ आपल्यासोबत यात्रेत केवळ एक बॅग घेऊन चालत आहेत. ज्यात तीन जोडी कपडे, टॉवेल, खाण्यासाठी नाम मात्र खाद्य सामग्री ठेवतात. सायकल यात्रे दरम्यान दररोज ३० – ६० कि.मी. प्रवास ते करतात. आपले जीवण देशहितासाठी समर्पित करणाऱ्या डॉ.सेठ यांचा एखाद्या तरुणालाही लाजवेल असा उत्साह, कार्यावरील निष्ठा आणि उर्जा अंचभित करणारी आहे. असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. (Cycle Journey From Kashmir To Kanyakumari)

हेही वाचलंत का?

Back to top button