अकोले: ६५ वर्षीय महिलेला बिबट्याने १०० फूट फरफटत नेत पाडला फडशा | पुढारी

अकोले: ६५ वर्षीय महिलेला बिबट्याने १०० फूट फरफटत नेत पाडला फडशा

अकोले, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील निळवंडे शिवारातील खडके वस्तीवरील ६५ वर्षीय महिलेला बिबट्याने १०० फूट फरफटत नेऊन फडशा पाडल्याची घटना घडली. तालुक्यात बिबट्याने दुसरा बळी घेतला असून नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील निळवंडे शिवारातील खडके वस्तीवर रखमाबाई तुकाराम खडके ( वय ६५ वर्षे) या राहत असुन काल रात्री त्या सपराच्या घरात झोपलेल्या असताना मध्यरात्रीनंतर बिबट्याने घरात प्रवेश करुन त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना १०० फूट ओढत नेऊन त्यांचा फडशा पाडला. या हल्ल्यात रखमाबाई खडके यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने निळवंडे व परिसरातील गावामध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. वारंवार बिबट्याचे हल्ल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. बिबट्याचा वावर पूर्वीही होता. मात्र, आता तो मोठ्या प्रमाणात वाढला असुन बिबटे माणसांवरही हल्ले करु लागले असल्याने वनविभागाने गावोगावी पिंजरे लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .

दरम्यान या घटनेच्या एक दिवस अगोदर याच ठिकाणाहून बिबट्याने शेळी नेली होती. त्यामुळेच गुरुवारी पुन्हा येत बिबट्याने हल्ला केला असावा, असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सदर घटनेचा पंचनामा करुन मृतदेहाचे अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अकोले तालुक्यात उसाचे प्रमाण वाढले असल्याने बिबट्याचा वावर जास्त प्रमाणावर वाढला आहे. शिकारीसाठी बिबट्याचा वावर मानव वस्तीमध्ये वाढला असून अशी घटना पुन्हा घडू नये म्हणुन सर्व नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी. विशेष करून लहान मुलांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन राजूर वनक्षेत्रपाल राजश्री साळवे यांनी केले.

या घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली आहे. या घटनेबाबत सविस्तर प्रस्ताव शासन दरबारी पाठवून शासनाचे अनुदान कुटुंबातील वारसांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

-राजश्री साळवे, राजूर वनक्षेत्रपाल

Back to top button