नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणूक : ८५ केंद्रावर शांततेत मतदान | पुढारी

नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणूक : ८५ केंद्रावर शांततेत मतदान

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेतील शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक प्रवर्गातील जागांसाठी ४ जिल्ह्यातील ८५ मतदान केंद्रावर आज (दि. २०) शांततेत मतदान पार पडले. मंगळवारी (दि.२२) मतमोजणी होणार आहे.
प्रत्येक वर्गांसाठी मतदारांची संख्या वेगवेगळी आहे. सिनेट निवडणुकीच्या निमित्ताने सुमारे महिनाभरापासून विद्यापीठातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध संघटनांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. रविवारी शिक्षक, प्राचार्य व संस्थाचालक प्रतिनिधीनी मतदानाचा हक्क बजावला.

यासंदर्भात कुलसचिव प्रा. राजू हिवसे यांनी सांगितले की, मतदानासाठी शहरात एकूण २९ मतदान केंद्र होती. प्रत्येक केंद्रात २-३ कर्मचारी तैनात आहेत. अशा प्रकारे सर्व केंद्रांवर एकूण २५० कर्मचारी, अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मतदारांमध्ये उत्साह दिसला. निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी विशेष कार्यकारी अधिकारी वसीम अहमद यांच्याकडे आहे.

या निवडणुकीच्या आखाड्यात महाविकास आघाडीने सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिक्षण मंच, नुटा आणि परिवर्तन पॅनलकडूनही निवडणुकीसाठी पूर्ण जोर लावला जात आहे. पदवीधर वर्गासाठी येत्या ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतपेट्या नागपुरात चोख सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात येणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडून यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button