नागपूरकरांनी दोन वर्षानंतर अनुभवल्या चित्तथरारक हवाई कसरती | पुढारी

नागपूरकरांनी दोन वर्षानंतर अनुभवल्या चित्तथरारक हवाई कसरती

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित एअरफेस्ट-२०२२ च्या माध्यमातून नागपूरकरांनी दोन वर्षानंतर चित्तथरारक हवाई कसरती अनुभवल्या आहेत. खरंतर निमंत्रितांसाठी वायुसेना मुख्यालयाच्या मैदानावर हा ‘शो’ असला तरी आसपासच्या परिसरात, इमारतींवर लोकांनी मोठी गर्दी केली. या शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकॉप्टर चमूने केलेल्या हवाई कसरतींनी नागपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. कोव्हिडमुळे दोन वर्षांनंतर नागपूरला ही पर्वणी मिळाली.

वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर शनिवारी सूर्यकिरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर, ॲवरो, आकाशगंगा, एअर वॉरिअर्स ड्रिल टीम, एनसीसी ग्लायडर्स आदींच्या कसरती पाहता आल्या. एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण विशेष आकर्षण होते. यंदाच्या शोमध्ये नजरेचे पाते लवण्यापूर्वीच शत्रूच्या दृष्टीआड होणाऱ्या सुखसोईचा समावेश नसल्याने  भारतीय वायुसेनेचा कणा असलेल्या अत्याधुनिक अशा या लढाऊ विमानाच्या हवाई कसरतींना नागपूरकर मुकले. आकाशगंगा’ पथकातील १० योद्धयांनी ८ हजार फूट उंचावर तिरंगा फडकवला. श्वास रोखून धरणाऱ्या हवाई कसरती आणि प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश होता.

इतर उपक्रमांमध्ये पॅरा ग्लाइडिंग, लढाऊ विमानांचा फ्लायपास्ट, आयएएफ उपकरणांचे प्रदर्शन, एरो-मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँडचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. डॉर्नियर विमानातून आठ हजार फूट उंचीवर स्कायडायव्हिंग करण्यात आले. जगात चार ते पाच देशांमध्ये सूर्यकिरणसारख्या एरोबॅटिक डिस्प्ले टीम आहेत. यात सूर्यकिरण ही सर्वोत्तम असून ती देशाचा सन्मान वाढवित असल्याची माहिती सूर्यकिरण चमूतील फ्लाइट लेफ्टनंट आणि टीम समनवयक रिद्धिमा गुरुंग यांनी दिली.

हेही वाचा : 

Back to top button