वाघाच्या अवयवांसह दोन तस्कर जाळ्यात; नागपूर व भंडारा वनविभागाची कारवाई | पुढारी

वाघाच्या अवयवांसह दोन तस्कर जाळ्यात; नागपूर व भंडारा वनविभागाची कारवाई

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : भंडारा जिल्ह्यातील नाकडोंगरी वन परिक्षेत्रातील गोबरवाही येथे वाघ नखांसह वन्य जीवांच्या विविध अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली. ही कारवाई नागपूर व भंडारा वन विभागाच्या पथकांनी शनिवारी सायंकाळी संयुक्‍तपणे  केली. आरोपींकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले असून, यामध्‍ये 15 वाघनखे, 3 सुळे दात, 10 जोड दात (दाढ), 5 किलो हाडांचा समावेश आहे.

वनविभागाच्या अधिका-यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संजय श्रीराम पुस्तोडे (वय 41) रा. चिखला माईन्स व रामू जयदेव ऊईके (वय 33, रां. असलपणी ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. नाकडोंगरी वन परिक्षेत्रातून वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार वन विभागाने आरोपी आणि त्‍यांच्याकडील अन्य वन्यजीवांच्या अवयव ताब्‍यात घेतले.

वन विभागचे पथक दोन्ही आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवूनच होते. लगेच गोबरवाही भागात सापळा रचण्यात आला. आरोपी वन्यजीवांच्या अवयव, साहित्यासह तिथे पोहोचताच अचानक धडक देऊन मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून वाघनखे, दात व हाडे जप्त करण्यात आली. सुगावा लागल्यास आरोपी पळून जाण्याची किंवा त्याच्याकडील साहित्य नष्ट करण्याची शक्यता होती. यामुळे आरोपींवर पाळत ठेवण्यात आली. बनावट ग्राहकांना पाठविण्यात आले. दोन दिवस त्‍यांना चर्चेत  गुंतवून ठेवले आणि शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा  

Back to top button