डॉ. दिलीप मालखेडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू | पुढारी

डॉ. दिलीप मालखेडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवीन कुलगुरू म्हणून डॉ. दिलीप मालखेडे यांची निवड करण्यात आली आहे. डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवड समितीने नवीन कुलगुरू म्हणून मालखेडे यांच्या नावावर शनिवारी (११ सप्टेंबर) शिक्कामोर्तब केले.

डॉ. दिलीप मालखेडे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक आहेत. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली आहे.

डॉ. मालखेडे हे सध्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार -१ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत. मालखेडे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेतून पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे  (एमई) शिक्षण घेतले आहे.

मालखेडे यांचा प्रदीर्घ अनुभव

मुंबई आयआयटी मधून त्यांनी संशोधन कार्य करीत पीएचडी प्राप्त केली आहे. मालखेडे यांना तीन दशकाहून अधिक शैक्षणिक आणि तीन वर्ष उद्योग क्षेत्रात कार्याचा अनुभव आहे.

माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ दिनांक १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते. नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया वेळेवर सुरू न झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन कुलगुरु निवडण्याकरीता समितीचे गठन करण्यात आले. समितीकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

या पदाकरिता एकूण तब्बल १२० अर्ज समितीकडे प्राप्त झाले होते. या अर्जातून छाननी अंती २० अर्ज निवडण्यात आले. या २० अर्जांपैकी ५ जणांच्या नावांची यादी निवड समितीने राज्यपाल भगतसिंग कोसारी यांच्याकडे पाठवली होती.

यामध्ये डॉ. दिलीप मालखेडे, दिल्ली येथील डॉ. उमेश कदम, अमरावती येथील डॉ. दीपक धोटे, औरंगाबाद येथील डॉ. कारभारी काळे, वाशीम येथील डॉ. नंदकिशोर ठाकरे यांचा समावेश होता. यातून मालखेडे यांची कुलगुरुपदी निवड करण्यात आली.

हे ही वाचलं का?

Back to top button