मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गम भागातील पोलिसांसमवेत साजरी केली दिवाळी

गडचिरोली,पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील धोडराज येथील पोलिस मदत केंद्रात जवानांसमवेत दिवाळी साजरी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस जवानांना दिवाळीचा फराळ, फटाके आणि जीवनोपयोगी साहित्याचे वाटप केले. शिवाय त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पोलिसांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे शिंदे म्हणाले.
भामरागड तालुका दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. या भागात कार्यरत पोलिस जवान आपल्या कुटुंबीयांपासून बरेच दिवस दूर राहून नक्षल्यांशी लढतात. त्यामुळे दिवाळीसारख्या सणात त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपण आलो. नक्षल्यांचा मुकाबला करण्यासाठी राज्याचे पोलिस दल सक्षम आहे. गडचिरोली जिल्ह्यात नवीन उद्योग आणि विविध योजनांद्वारे नागरिकांच्या हाताला काम देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने पावले उचलली आहेत, असेही ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धोडराज येथील पोलिस मदत केंद्राच्या नवीन इमारतीचेही लोकार्पण करण्यात आले. तसेच आदिवासी नागरिकांना ब्लँकेट, फवारणी संच आणि बालकांना मिठाई व स्कूल बॅगचे वितरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस उपमहानिरीक्ष संदीप पाटील, पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे उपस्थित होते.
हेही वाचा
नागपूर : पोलिसांसोबत सण साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते : मुख्यमंत्री शिंदे
संगमनेर : सरकारकडून फक्त घोषणा, मदत नाही :आ. बाळासाहेब थोरात
अमरावती: मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरले