नागपूर : पोलिसांसोबत सण साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

नागपूर : पोलिसांसोबत सण साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते : मुख्यमंत्री शिंदे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नक्षलग्रस्त दुर्गम भागात पोलिसांसोबत दिपावलीचे क्षण साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते आणि म्हणूनच मी दरवर्षी नित्यनियमाने गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबत दिवाळी साजरी करतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भामरागड येथे चेकपोस्टवर पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एक दिवसीय गडचिरोली दौऱ्यावर आले असता नागपूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी शिंदे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असताना देखील मी दरवर्षी पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी येत असे. आता मुख्यमंत्री आहे तरीही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. पोलिसांसोबत आनंद वाटून घेण्यासाठी मी भामरागडला जात आहे. पोलिसांचे मनोबल वाढल्याने गडचिरोलीमध्ये नक्षलवाद कमी होत चालला आहे, असा दावाही त्यांनी केला. आपला जीव धोक्यात घालून पोलीस काम करीत असतात. त्यात गडचिरोली जिल्ह्यात काम करणाऱ्या पोलिसांच्या जिवाला क्षणोक्षणी धोका असतो. तरीही ते उत्तम काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत सण साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते, लढण्याची उर्मी निर्माण होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

नुकसान भरपाई लवकरच

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नुकसान भरपाईसाठी हेक्टरची मर्यादा वाढवली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मंत्रीमंडळ विस्तारात सर्वांचाच विचार

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पूर्व विदर्भात चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात पूर्व विदर्भाला स्थान मिळेल का, असे विचारले असता केवळ पूर्व विदर्भच नव्हे तर सगळ्यांचाच विचार विस्तारात केला जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. शिर्डी ते नागपूर लवकरच प्रवास सुरू होईल, असे समृद्धी महामार्गाबाबत बोलताना ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या सोबत राजकीय चर्चा नाही

दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावले होते. दिपोत्सवासाठी आम्ही गेलो होतो. यावर्षी राज्यात सर्व सण आनंदाने साजरे होत आहेत. त्याचा आनंद आज राज्यभरात बघायला मिळतो. ठाकरेंसोबत राजकीय चर्चा नव्हती, सण आणि उत्सव याच विषयांवर त्यांच्याशी बोलणे झाले, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

   हेही वाचलंत का ?

 

Back to top button