चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी ठार | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : गावातील नागरिकांची जनावरे चारायला घेऊन गेलेल्या दोन गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना आज, बुधवारी ( दि.19) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील कवळपेठ जंगलात घडली. या घटनेने शेतकरी, शेतमजूर व गुराखी भयभीत झाले आहेत. नानाजी निकेसर ( वय ५३) व ढिवरू वासेकर (वय ५५) असे मृत गुराख्यांची नावे असून दोघेही एकाच चिचाळा गावातील रहिवासी होते.

मुल तालुक्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील कवळपेठ जंगलात चिचाळा येथील गुराखी नानाजी निकेसर व ढिवरू वासेकर यांनी गावातील नागरिकांचे जनावरे बुधवारी सकाळी चारायला घेऊन गेले होते. साडेनऊच्या सुमारास कवळपेठ परिसरातील जंगलात जनावरे चरत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने ह्या दोन्ही गुराख्यावर हल्ला चढविला. यामध्ये दोघांनाही वाघाने जागीच ठार केले. बराच वेळ होउनही दोन्ही गुराखी घरी न आल्याने काही नागरिकांनी जंगलात येऊन पाहिले असता, दोन्ही गुराख्यांचे मृतदेह आढळून आले.

तत्काळ चिचपल्ली वनपरिक्षेत्राधिकारी यांना घटनेची माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे व मूल वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर यांनी घटनेची पाहणी करुन पंचनामा केला. दोन्ही गुराख्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठविण्यात आले. वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांनी दोन्ही मृतकांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 30 हजार रुपयांची मदत करून कुटुंबियांचे सांत्वन केले.

अधिक वाचा :

Back to top button