गडचिरोली : चारा आणण्यासाठी गेलेला तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार, आठवडाभरातील तिसरी घटना | पुढारी

गडचिरोली : चारा आणण्यासाठी गेलेला तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार, आठवडाभरातील तिसरी घटना

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा: शेळ्यांसाठी चारा आणायला जंगलात गेलेला तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज (दि.११) सकाळी ८ च्या सुमारास आरमोरी तालुक्यातील रवी गावानजीकच्या जंगलात घडली. पुरुषोत्तम सावसाकडे (वय ३५, रा. रवी) असे मृत तरुणाचे नाव आहे. आठवडाभरात वाघाच्या हल्ल्यात तीन जण ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रवी येथील रहिवासी पुरुषोत्तम सावसाकडे आज सकाळी शेळ्यांसाठी चारा आणायला गावानजीकच्या जंगलात गेले होते. झाडाच्या फांद्या तोडत असताना जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे.

आठवडाभरात वाघाच्या हल्ल्यात आरमोरी तालुक्यातील २, तर गडचिरोली तालुक्यातील एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. यामुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. आरमोरी तालुक्यातील जंगलात टी-२ या वाघिणीसह तिच्या दोन बछड्यांचादेखील वावर आहे. त्यामुळे हा हल्ला टी-२ या वाघिणीने केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button